हिंगोली (जिमाका), दि. 28 : प्रस्तावित कामे व नवीन कामाचे प्रस्ताव अडचणीचे निराकरण करुन तातडीने सादर करावेत. मागणीनुसार आपणास निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2022-23 या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च करावा, अशी सूचना राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी 200 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 51 कोटी 50 लाख व आदिवासी उपयोजनेसाठी 18 कोटी 71 लाख 71 हजार असे एकूण 270 कोटी 21 लाख 71 हजार रुपयाचा नियतव्यय मंजूर आहे. यापूर्वी 24 जून, 2022 रोजीच्या जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या 42 कोटी 71 लाख रुपयाची कामे रद्द करुन नव्याने मान्यता घेण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. तसेच या मंजूर नियतव्ययाचे योग्य नियोजन करुन सन 2022-23 चा निधी मार्चच्या अगोदर खर्च करावा. यामध्ये शासनाच्या सर्व योजनांची कामे वेळेत पार पाडावीत. एक काम दोन योजनेत येणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांनी वाढलेले दर गृहीत धरुन प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. जिल्ह्याच्या विकासात सर्व यंत्रणांचा खारीचा वाटा आहे. आपल्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात नाविण्यपूर्ण कामे करावीत. येत्या मार्च महिन्यात मा.उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन 200 कोटीवरुन 250 कोटीपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
यावेळी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने तेथील परिस्थितीचा अभ्यास करुन त्याठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी 10 लक्ष रुपयाचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच रब्बी पिकांसाठी पिक कर्जाचे जास्तीत जास्त वितरण करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन सर्व बँकांना निर्देश द्यावेत. महावितरण विभागाने यंदा पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा वापर करण्यासाठी नवीन डीपी बसवून द्यावेत. त्यांना वीजपुरवठा करताना कोणत्याही अडचणी येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व निजामकालीन शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नुतनीकरण करण्यासाठी राज्याकडून 90 टक्के निधी देण्यात येणार आहे. उर्वरित 10 टक्के लोकवाटा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देऊन शाळा दुरुस्ती करावी. जिल्हा परिषद शाळेतून चांगला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षण विभागांनी तसे नियोजन तयार करावे.
राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी एक कोटी रुपयांचे पुनर्विनियोजन करण्यात आले असून या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून लम्पी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात लस, औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावेत. जनावरांना सकस खाद्य देण्यासाठी प्रोटीनयुक्त गवताची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच जनावरांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
वन विभागाने वन प्राण्यांनी केलेल्या पीक नुकसानीची पाहणी करुन पीक नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन द्यावी. तसेच वन प्राण्यापासून पिंकाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाचा डोंगराळ भागाशेजारी चर खोदून पिकांचे नुकसान थांबवावे. तसेच वनजमीन सुरक्षित करावी. यासाठी लागणारा निधी रोहयोतून खर्च करावा. एक दिवस बळीराजासाठी या अभियांनातर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करुन त्यांच्या समस्याचे निराकरण करावे, असे निर्देशही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
जिल्ह्यातील पोलीसांना नवीन वाहने उपलब्ध करुन द्यावीत. त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. तसेच पोलीसांचे निवासस्थान अत्यंत खराब झाले असून त्यांच्या निवासस्थानाचे काम करण्यासाठी पोलीस हाऊसींग बोर्डाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिक्षण, क्रीडा, कृषी, पशुसंवर्धन, रब्बी पिक कर्ज वाटप, क्रीडा विभाग, ग्रंथालय, कौशल्य विकास, आरोग्य , महिला व बालकल्याण, गृह आदी विभागाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी आमदार सर्वश्री. तान्हाजी मुटकुळे, राजू नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव यांनी मांडलेल्या विविध विषयांवर योग्य नियोजन करुन जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीनंतर एकता सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांच्यासह सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.
****