• Fri. Nov 15th, 2024

    बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा – क्रीडामंत्री गिरीष महाजन

    ByMH LIVE NEWS

    Oct 19, 2022
    बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा – क्रीडामंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. 19 : बालेवाडी (पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील काही सुविधा अद्ययावत करणे गरजेचे आहे. या क्रीडा संकुलातील सुविधाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणे आवश्यक आहे. त्यामुळे या संकुलातील सुविधा निर्मितीसाठीच्या अत्यावश्यक कामांसंदर्भात प्रस्ताव सादर करा, असे निर्देश क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी क्रीडा विभागाला दिले. विविध कामांसाठी राज्यस्तरावरुन अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करु, त्यासोबतच केंद्र सरकारकडून क्रीडा विकासासाठी अधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करु, असे त्यांनी सांगीतले.

    येथील मंत्रालय दालनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक उदय जोशी आदी उपस्थित होते.

    यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी शिवछत्रपती क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.  क्रीडा संकुलाचा एकूण परिसर, आतापर्यंत संकुलात झालेल्या स्पर्धां, विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा, वसतीगृह व्यवस्था, क्रीडा विज्ञान केंद्र, फिटनेस सेंटर आदींची माहिती त्यांनी घेतली. या सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    सध्या क्रीडा संकुलातील मुख्य ॲथलेटीक्स क्रीडांगण नूतनीकरणाच्या अनुषंगाने मंत्री श्री. महाजन यांनी माहिती घेतली. या क्रीडा संकुलात ॲथलेटीक्स सिंथेटीत ट्र्रॅक व अद्ययावत इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, व्हीडिओ मॅट्रीक्स सिस्टीम, फोटो फिनिश सिस्टीम, स्मार्ट ट्रॅक तयार करणे आवश्यक आहे. शुटींग रेंजसाठी असणारी टारगेट सिस्टीम अद्ययावत करणे, क्रीडा संकुलातील फिटनेस सेंटर मध्ये उच्च क्षमतेच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, क्रीडा विज्ञान केंद्रात अद्यायावत सुविधा, सायकलिंग वेलोड्रोम, क्रीडा प्रबोधिनी वसतीगृह नूतनीकरण व क्षमता वृद्धी करणे गरजेचे आहे. याबाबत क्रीडा विभागाने प्रस्ताव सादर करावेत, तसेच यापूर्वी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याची सूचना मंत्री श्री. महाजन यांनी केली.

    यावेळी सचिव श्री. देओल आणि आयुक्त श्री. दिवसे यांनी सादरीकरणाद्वारे शिवछत्रपती क्रीडा संकुलाबाबतची माहिती मंत्री श्री. महाजन यांना दिली.

    ****

    राजू धोत्रे/विसंअ/19.10.2022

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed