• Fri. Nov 15th, 2024

    प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

    ByMH LIVE NEWS

    Oct 4, 2022
    प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

    मुंबई, दि. 4 : शालेय जीवनात ऐकलेले, अनुभवलेले प्रबोधनात्मक विचार विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात. या गोष्टी त्यांच्यासाठी पुढे अनुकरणीय होतात, प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी व्यक्त केला.  जागतिक प्राणी दिनानिमित्त मुंबई जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी तर्फे मुंबई जिल्ह्यातील बृहन्मुंबई  महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना प्राण्यांबाबत जागृती करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजित रानडे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग डॉ. प्रशांत कांबळे, महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृहाचे डॉ. कलीमपाशा पठाण तसेच वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग या संस्थेचे अबोध अरास, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा  सदस्य सचिव डॉ. शैलेश पेठे, बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    महानगर पालिकेच्या शाळेत अशाप्रकारे साजरा करण्यात आलेला हा महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण जनजागृती कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना प्राण्यांचे अधिकार व प्राण्यांविषयक कायद्यांची माहिती देणाऱ्या प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते झाले. जागतिक प्राणी दिनानिमित्त मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक व सन्मानपत्र वितरित करण्यात आले.

    जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणाले, प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात येत असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यानिमित्त मुंबई शहरातील विविध शाळांत मुलांमध्ये प्राण्यांविषयी जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचा भविष्यात सकारात्मक परिणाम दिसेल. प्राण्यांवर दया करण्याविषयी केलेली चित्रफित पाहून मुले त्याचे अनुकरण करतील.

    डॉ. रानडे यांनी मनुष्याच्या सानिध्यात राहणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व सांगीतले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ – भोईवाडा मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे प्राण्यांचे महत्त्व विषद केले. डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी आभार मानले.

    ००००

    वृत्त: श्री. राजू धोत्रे/श्री. संजय ओरके (विसअ)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed