• Thu. Nov 14th, 2024

    महात्मा गांधी यांचे विचार कृतीत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    Oct 2, 2022
    महात्मा गांधी यांचे विचार कृतीत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    • हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ

    • वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन

    • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ नद्यांच्या परिक्रमेस प्रारंभ

     

    वर्धा, दि. 02 : सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठया जनांदोलनात परावर्तित केला. बापूजी सर्वसामान्य माणसाच्या सेवेला ईशसेवा – देशसेवा मानत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपित्याचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जाणिवेने काम केले जात आहे म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा सर्वार्थाने औचित्यपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 नद्यांची परिक्रमा, हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ आणि वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

    महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यावेळी उपस्थित होते.

    वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन वास्तू  केवळ प्रशासकीय असू नये. ती जनतेची व्हावी. ती सर्वसामान्यांना न्याय देणारी ठरावी, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जगातील सर्व संस्कृती नदीच्या काठावरच निर्माण झाल्या आणि बहरल्या. जेव्हा या नद्या नष्ट झाल्या तेव्हा संस्कृती नष्ट झाल्या. सर्वांनी नद्यांचे महात्म्य जाणून घ्यावे. ती आपली माता आहे ती वाचली तरच आपण वाचणार आहोत. त्यामुळे या भावनेने साऱ्या नद्या समजून घ्याव्यात. त्यासाठी आवश्यक असणारी जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी तसेच या नद्या प्रवाही, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज सुरू करण्यात आलेला 75 नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. या उपक्रमामुळे नद्यांशी असलेले आपले नाते पुनरुज्जीवित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    स्वातंत्र्य लढ्यात ‘वंदे मातरम्’ हे शब्द खऱ्या अर्थाने राष्ट्रभावना चेतवणारे ठरले होते. ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणणे म्हणजे गुलामगिरीच्या शृंखला तोडणे. ‘वंदे मातरम् ‘च्या माध्यमातून इतिहासातील तीच ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करण्याचा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. पालकमंत्री म्हणून वर्धा जिल्ह्याची जबाबदारी आपण घेतली असून महिलांच्या उद्योगासाठी क्लस्टर निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्ह्याच्या विकासाठी अडचणी दूर केल्या जातील. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी 365 कोटी रुपयांची मदत पंधरा दिवसात जिल्ह्याला देण्यात आली. त्यापैकी सुमारे 52 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांना सात दिवसात मदत मिळेल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

    सर्वसामान्य व्यक्तींना विकासाचा केंद्रबिंदू मानून सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात आला. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रेरणा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याची ऊर्जा घेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले घरपोच देण्यात आले. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात आला. यापुढेही जनतेचे प्रश्न गतीने सोडविण्याचे काम शासनामार्फत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ते यावेळी म्हणाले.

    सुशासनाचा संकल्प घेवून काम करणारे नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते सुराज्याची संकल्पना मांडणारे महात्मा गांधी यांच्या जयंतीदरम्यान आयोजित करण्यात आलेला सेवा पंधरवडा यशस्वी झाल्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. स्वातंत्र्य लढ्याचा जाज्ज्वल्य इतिहास स्मरणात राहावा, यासाठी ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणून संभाषणाची सुरुवात करावी. ‘वंदे मातरम्’ हे आपले राष्ट्रगान असून त्याचा सन्मान करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गॅझेटियरच्या धर्तीवर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्रातील शूर वीरांचा इतिहास, भौगोलिक वारसा श्राव्य स्वरुपात नव्या पिढीला उपलब्ध करून देण्याची घोषणा श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. तसेच सर्व जिल्ह्यांचे गॅझेटियर नव्याने प्रकाशित केले जाणार असून त्याची सुरुवात वर्धा जिल्ह्यापासून झाल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा येथे इको-टुरिझम पार्क उभारण्यासाठी 20 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी जाहीर केले.

    जलसंधारण आणि जलसाक्षरता या दोन्ही संकल्पनांची सांगड घालणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, असा गौरव करून प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले,  महाराष्ट्रात यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून राबवण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे खऱ्या अर्थाने जनआंदोलन ठरले. महाराष्ट्र इतर राज्यांना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आजच्या काळात पाणी हेच अमृत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त आयोजित 75 नद्यांची परिक्रमा हा राज्यातील नद्या अमृतवाहिनी करण्याचा उपक्रम आहे. त्या माध्यमातून नदी जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. अतिक्रमण, अस्वच्छतेसारख्या विविध प्रकारच्या समस्यांपासून आता नद्यांनाही स्वातंत्र्य हवे आहे. त्यासाठी असे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. या संदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. उत्सवांना लोककल्याणकारी योजनांशी जोडण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय असल्याचेही ते म्हणाले.

    महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या सर्वांगीण विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांना घरकूल, वीज, पाणी, अन्नधान्य देऊन त्यांच्या विकासाला हातभार लावला आहे. तसेच बापुजींची स्वच्छतेची शिकवण प्रत्यक्षात आणण्यासाठी यशस्वी अभियान राबविल्याचे खासदार श्री. तडस यांनी सांगितले.

    समाजासाठी काहीतरी करणे, हीच महात्मा गांधी यांना खरे अभिवादन ठरेल, अशी भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार सर्वांनी समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आमदार डॉ. भोयर यावेळी म्हणाले.

    सेवा पंधरवड्याअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अतिक्रमित घरकुल पट्टे, आयुष्मान भारत पत्रिका, कृषि अभियांत्रिकी उपअभियान अंतर्गत ट्रॅक्टर आदी लाभांचे वितरण करण्यात आले. तसेच या पंधरवड्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. ‘चला जाणुया नदीला’ या अभियानांतर्गत राज्यातील 75 नद्यांची परिक्रमा करण्यात येणार असून या मोहिमेत सहभागी झालेल्या चमूंना मंगल कलश आणि तिरंगा सुपूर्द करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाने तयार केलेल्या वर्धा जिल्हा विशेष गॅझेटियरचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाच्या चित्रफितीचे प्रकाशन करून अभियानास प्रारंभ करण्यात आला.

    प्रारंभी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांच्या दालनांची आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या चित्रकला प्रदर्शनीची मान्यवरांनी पाहणी केली. खासदार रामदास तडस यांच्या विकास निधीतून दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचे वितरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या ‘वैष्णव जन ते…’ आणि गायक नंदेश उमप यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ या गीतांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आभार मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed