• Thu. Nov 14th, 2024

    महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार – केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे

    ByMH LIVE NEWS

    Oct 2, 2022
    महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार – केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे

    वर्धा, दि. 02 (जिमाका) : वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे सांगितले.

    महात्मा गांधी औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे तीन दिवसीय सेवाग्राम औद्योगिक महोत्सव प्रदर्शन, विक्री आणि कार्यशाळेचे उद्घाटन श्री. राणे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा, सचिव बी. स्वैन, केंद्रीय अपर सचिव शैलेश कुमार सिंह, संयुक्त सचिव विपुल गोयल, राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे सदस्य सुनिल मानसिंहका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    भारताची अर्थव्यवस्था कृषीक्षेत्रावर आधारित असून ग्रामविकास हा त्याचा कणा आहे. याचे महत्त्व जाणून महात्मा गांधींनी ‘स्वयंपूर्ण खेडे’ ही संकल्पना राबविली. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील ग्रामविकास घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी शासन अविरत प्रयत्नशील आहे. सेवाग्राम येथे लवकरच महात्मा गांधींच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात येईल. पर्यटक तसेच अभ्यासूंना येथे गांधींजींच्या जीवनकार्याची माहिती तर मिळेलच शिवाय येथील खादी व्यवसायाला बाजारपेठेत योग्यस्थान मिळून दिले जाईल. खादीचा खप वाढविण्यासाठी गरजेनुसार व फॅशनप्रमाणे कपड्यांची निर्मीती करण्यात येईल. मागणीप्रमाणे खादी वस्त्रांचा पुरवठा केल्यामुळे केवळ वर्धेतच नाही तर संपूर्ण देशभर येथील खादीला मागणी राहील. यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पर्यटन तसेच खादी व्यवसायातून येथील अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी लघु आणि मध्यम उद्योग विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येतील, असेही पुढे बोलतांना श्री. राणे म्हणाले.

    सेवाग्राम स्मारकाच्या उभारणीसाठी शासनस्तरावर लवकरच समिती नेमण्यात येईल. वर्धा व सेवाग्राम परिसराचा विकास करण्यासाठी आणि येथील खादी व्यवसाय, गौशाळेवर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी नवयुवकांना प्रोत्साहित करण्यात येईल. सेवाग्राम स्मारक लवकरच नवे ‘उद्योग केंद्र’ म्हणून विकसित होईल, असा विश्वास श्री. राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

    महात्मा गांधी औद्योगिक संस्थानाची निर्मिती ही ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा पाया आहे. ग्रामोद्योग विकासाला चालना देवून नवनवीन उद्योगांची निर्मिती करण्यास येथे प्रोत्साहन दिले जात आहे. खादी क्षेत्राला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी  सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयामार्फत संबंधित विषयाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. खादी व्यवसायामुळे अकरा कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. खादी व गोशाळेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होवून यावर आधारित उद्योगांची व्याप्ती वाढावी यासाठी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयामार्फत येथे विविध प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात येतील, असा असे केंद्रीय राज्य मंत्री भानु प्रताप सिंग वर्मा यांनी सांगितले.

    एमगिरीद्वारे प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षणार्थींने येथे विविध वस्तूंचे प्रदर्शन लावले आहे. यामध्ये नैसर्गिक रंगापासून तयार केलेले कापड, खादीच्या साड्या, कुडते, पंचगव्यनिर्मित साबण, शांम्पू, दंतमंजन, मध, दैनंदिन गरजेच्या वस्तू, गोंदिया येथील बोधना आर्ट हँड पेंटींग, लाखेपासून निर्मित बांगड्या, घाणेरी या जंगली झाडींपासून तयार आकर्षक फर्निचर, बांबूपासून निर्मित लामणदिवे, कंदील याशिवाय गायीच्या शेणापासून मुर्ती तसेच गृह सजावटीच्या आकर्षक वस्तु प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी एमगिरीच्या प्रांगणातील महात्मा गांधी तसेच माँ कस्तुरबा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सूतमाळ अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच येथील कोविड लसीकरण कॅम्पचे उदघाटन केले. परिसरात आयोजित स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन करुन स्वच्छता विषयक साहित्यांचे वाटप केले. कार्यक्रमाचे संचालन मनोज कोहळे यांनी केले तर आभार स्वाती शाही यांनी मानले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed