• Mon. Nov 25th, 2024

    सर्वसामान्य लोकांचे शासन दरबारी प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी सेवा पंधरवडा – महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    ByMH LIVE NEWS

    Sep 25, 2022
    सर्वसामान्य लोकांचे शासन दरबारी प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी सेवा पंधरवडा – महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    नांदेड (जिमाका) दि. 25 :- सर्वसामान्य, गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी यांना विकासाच्या प्रवाहात समावून घेण्यासाठी शासन दरबारी असलेले त्यांचे जे काही कामे असतील ते मार्गी लावण्यासाठी आपण सेवा पंधरवाडा हाती घेतला आहे. जनतेचे आपण सेवक आहोत अशी उत्तरदायीत्वाची भावना प्रशासनाच्या अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. या सेवा पंधरवाडाच्या काळात सर्व सामान्यांची प्रलंबीत असलेली कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भागवत देवसरकर, शाम बापू भारती महाराज, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार जीवराज डापकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त प्रत्येक तालुकापातळीवर सर्व समावेशक उपक्रम झाली पाहिजेत. अशा उपक्रमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मोलाची मदत होईल. प्रशासनात दिरंगाई करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्यास शासन मागे-पुढे पाहणार नाही असे  मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. खेड्याकडे चला असे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे. यात खेड्यातील लोकांना विकासाच्या वाटेवर आणण्याचा उद्देश त्यांचा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने आम्ही अधिकाधिक विकास योजना लोकांपर्यंत पोहचवू. राज्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी असे त्यांनी सांगितले.

    यावेळी हदगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार जीवराज डापकर यांनी  76 कोटी 73 लाख 2 दोन हजार 208 रुपये एवढ्या रक्कमेचा धनादेश पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वितरणासाठी बँकेच्या नावे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांचे समयोचित भाषण झाले.

    हदगाव तालुक्यात जुन ते ऑगस्ट 2022 या कालाधीत अतिवृष्टी / पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकाचे 33 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक बाधित झालेल्या क्षेत्रासाठी व तीन हेक्टरच्या मर्यादेत गावनिहाय बाधित शेतकऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या मदतीत 135 गावांचा समावेश आहे. यात 70 हजार 297 बाधित शेतकऱ्यांची संख्या असून एकुण बाधित क्षेत्र 56418.21 एवढे आहे. वितरित करावयाच्या रक्कमेत जिरायत पिकात बाधित क्षेत्र शून्य ते दोन हेक्टर पर्यंत 55305.3 हेक्टर एवढे आहे. प्रति हेक्टर रुपये 13 हजार 600 प्रमाणे रुपये 75 कोटी 21 लाख 67 हजार 040 आहे. 2 ते 3 हेक्टर मध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 2 हजार 39 एवढी आहे. बाधीत क्षेत्र 2 ते 3 हेक्टर पर्यंत 1112.88 असून प्रति हेक्टर 13 हजार 600 प्रमाणे 15 कोटी 13 लाख 5 हजार 168 एवढी रक्कम. याप्रमाणे एकुण वितरीत रक्कम 76 कोटी 73 लाख 02 हजार 208 एवढी आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed