• Mon. Nov 25th, 2024

    माळरानाचा राजा “माळढोक” – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 22, 2022
    माळरानाचा राजा “माळढोक” – महासंवाद

    “महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या परिसरातील गवताळ परिसंस्था ही “माळरानाचा राजा माळढोक” या एका पक्षासाठी अभयारण्य म्हणून घोषित केले. अति संकटग्रस्त असलेल्या माळढोक पक्षाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे.

    या अभयारण्यात माहे जुलै ते डिसेंबर या कालावधीत स्थलांतरित पक्षाचे दर्शन होत असते. माहे जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात या अभयारण्यात माळढोक पक्षाचे(मादी) दर्शन येथील वन कर्मचाऱ्यांना झाले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून माळढोक पक्षावर लक्ष ठेवून त्याच्या वेळोवेळी नोंदी घेतल्या जात आहेत. माळढोक पक्षी आल्याने या अभयारण्यात पर्यटकांचीही गर्दी वाढत आहे. पुढील काळात वन्यजीव विभागाच्या वतीने राजस्थान येथून काही नर  व मादी माळढोक आणून या अभयारण्यात त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या अभयारण्यात नियमितपणे माळढोक पक्षी दिसून आला तर या भागात पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून नान्नज येथील माळढोक पक्षी  अभयारण्य देशाच्या किंबहुना जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत मिळेल.

     माळढोक पक्षी अभयारण्य हे सोलापूर शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर सोलापूर-बार्शी राज्य मार्गावर नान्नज येथे आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर (अंशत:) तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, व श्रीगोंदा या तालुक्यातील 366.73 चौरस किलोमीटर क्षेत्र हे माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून राज्य शासनाने दिनांक 9 मार्च 2016 नुसार घोषित केले आहे.

    माळढोक हे महाराष्ट्र राज्यातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण करण्यात आले आहे.  कोणत्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे. देशातील अतिसंकटग्रस्त प्रजातीमधील माळढोकसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नान्नज (ता. उत्तर सोलापूर) अभयारण्यात सध्या एक माळढोक आढळून आलेला आहे.

    महाराष्ट्रातील या अभयारण्याचा भाग हा पूर्णतः पर्जन्यछायेत येतो व राज्यातील सर्वात कमी पावसाचा भागांमध्ये गणला जातो. त्यामुळे येथे झाडांनी व्यापलेला प्रदेश अतिशय नगण्य आहे. येथील जंगल हे मुख्यत्वे गवताळ आहे व काटेरी वनस्पतींनी व्यापलेले आहे. बाभूळ, आपटा, नीम,शीसव, मापटी, तारवाड, अमोणी, कांचारी यासारख्या वनस्पस्ती या जंगलात आहेत. येथील माळरानावरील गवताळ परिसंस्था ही सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर घालते.

     वन्यप्राणी संपदा:-

    माळढोक हा येथील मुख्य वन्य पक्षी असून अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. एवढा मोठा भूभाग संरक्षित करूनही माळढोक पक्षी जुलै ते डिसेंबर दरम्यानच येतो. डौलदार काळवीट हा माळरान परिसरात आढळणारा मुख्य प्राणी आहे. याबरोबरच तरस, कोल्हा, लांडगा, रानससा, खोकड, मुंगूस असे अनेक सस्तन प्राणी येथे मुक्तपणे वावरताना दिसतात.

    पक्षी वैभव :-

    माळढोक, गरुड, शिक्रा, कापशी घार, मधुवाज, माळ खरुची, श्रुंगी घुबड इत्यादी शिकारी पक्षी व टिटवी, धाविक, चंडोल, खाटिक, पखुरडी, हुदहुद, भारद्वाज, सातभाई, वेडाराघु, रातवा, कोतवाल, नीलपंख असे अनेक पक्षी येथे आढळतात.

    माळढोकचे अस्तित्व:-

    आपल्या देशात शहामृग दिसत नाही. शहामृग पक्षी आफ्रिकेमध्ये दिसतो. आपल्याकडे शहामृगापेक्षाही छान व डौलदार माळढोक पक्षी दिसतो. माळढोक भारतामधील उडणारा सर्वाधिक वजनदार पक्षी आहे. माळढोक पक्षी पूर्वी मोठ्या संख्येने दिसत होते, पण आज फक्त बोटावर मोजण्याइतकेच माळढोक उरले आहेत. माळढोक पक्षी कायमचा नष्ट होण्याच्या मार्गाला लागला आहे याची कारणे अनेक आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे याची मोठ्या प्रमाणामध्ये शिकार झाली. माळढोक माळरानावर राहतो पण माणसांची संख्या वाढली व माळढोकच्या घरात आपण घुसलो. माळढोक पिकांचे रक्षण करतो. त्यामुळेच घुबडासारखाच माळढोकही शेतकऱ्यांचा मित्रच आहे. तर अश्या सुंदर, राजस शेतकऱ्यांचा मित्राचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

     आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर:-

    अत्यंत धोकाग्रस्त असलेला माळढोक पक्षी व त्यांचे संवर्धन करणे, वाचविणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये वरोरा व नान्नज-मार्डी येथे अशाप्रकारे संवर्धनाचे प्रयत्न चालू आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर हा पक्षी या भागात प्रजननासाठी येण्याचा काळ असतो. एप्रिल 2015 मध्ये फेब्रुवारी महिन्यात नान्नज-मार्डी येथे आलेल्या बडू आणि छोटु या दोन माळढोक पक्ष्यांपैकी छोटुला सौर उर्जेवर चालणारा ट्रान्समीटर बसविणेत आला. ह्या ट्रान्समीटर मधुन रोज सकाळी 5.00 वा., 7.00 वा., 9.00 व 11.00 वाजता तसेच सांयकाळी 5.00 वा., 7.00 वा. व 9.00 वाजता या पक्ष्याचा ठावठिकाणा कळुन येतो. आतापर्यंत हा छोटू ज्या ज्या भागात हिंडलेला आहे त्यात असे दिसून आले आहे की, मोकळी जागा, शेतीची जागा व गवताळ प्रदेशात हा जास्तीत जास्त वेळ वास्तव्यास व खाण्यासाठी (Foraging) असतो. विशेषतः सकाळी व संध्याकाळी हा पक्षी उघड्या व गवताळ जागेमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ह्या माहितीवरुन माळढोक पक्ष्यांसाठी निश्चित कोणत्या प्रकारचे क्षेत्र संरक्षित करणे गरजेचे आहे हे समजून आल्याने त्या पद्धतीने या अभयारण्यात विशेष क्षेत्र संरक्षित करण्यात आलेले असून त्याचे संवर्धन ही योग्य पद्धतीने केले जात आहे.

    माळढोकचे प्रजनन:-

    माळढोक हा उडू शकणार्‍या पक्षांतील सर्वात वजनदार पक्षी आहे. नराची उंची 122 सेंमी(4 फूट) तर मादीची उंची 92 सेंमी(3 फूट) असते. नराचं वजन 15 किलो तर मादीचं वजन 7 किलोपर्यंत असतं.  पावसाळ्यात खायला भरपूर मिळत असल्यामुळे माळावरचे प्राणी, पक्षी प्रजनन करतात. अशा छान वातावरणामध्ये माळढोक पक्षीही प्रजनन करतो. मादीला आकर्षित करण्यासाठी नर माळढोक शेपटीचा छोटा पिसारा फुलवून मोरासारखा नाच करतो. नाच करतानाच माळढोक गळ्याची पिशवी फुगवून लांबपर्यंत ऐकू जाणारा हूमऽऽ हूमऽऽ असा आवाज करतो.

    या आवाजाकडे आकर्षित होऊन मादी नराकडे येते. दोघांचे मिलन झाल्यानंतर मादी घरटे न बांधताच जमिनीवरच एकच अंडे घालते. मादीचे लक्ष नाही असे कळताच कोल्हा, खोकड, लांडगा, घोरपडीसारखे प्राणी अंडे खायचा प्रयत्न करतात पण मादी दिवसरात्र अंड्याचे रक्षण करते. एक महिना अंडे उबविल्यानंतर अंड्यातून पिल्लू बाहेर पडते. माळढोकचे पिल्लू एक वर्ष आईबरोबर राहते. या एका वर्षात आई शिकारी पक्ष्यांपासून पिल्लाचे रक्षण करते. एका वर्षात पिल्लू आईकडून बऱ्याच गोष्टी शिकते. पुढील पावसाळ्यात पिल्लू आईपासून वेगळे होते. मादी परत प्रजननासाठी मोकळी होते व नवीन अंडे घालते.

    अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्र:-

     राज्यात 49 अभयारण्ये व 6 राष्ट्रीय उद्याने अशी 55 संरक्षित क्षेत्रे आहेत. ही सर्व संरक्षित क्षेत्रे धोकाग्रस्त, अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्र निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये  नान्नज माळढोक अभयारण्याचाही समावेश असल्याने हा परिसर धोकाग्रस्त अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्र असेल. म्हणजे पुढील काळात नान्नज अभयारण्यासाठी अधिक संरक्षण प्राप्त होणार आहे. माळढोक हा स्थलांतरीत व लाजाळू पक्षी असल्याने तो सहजासहजी दिसत नाही. माळढोक पक्षाच्या दर्शनासाठी पक्षी प्रेमींना तासनतास वाट पहावी लागते. हा पक्षी सहज दिसत नाही म्हणून अभयारण्यात नाही असे म्हणणेही चुकीचे ठरेल.

    अभयारण्यात माळढोक असल्याची नोंद

    या अभयारण्यात माळढोक पक्षी आढळल्यास त्याची नोंद वन विभागाकडे नियमितपणे होत असते. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी माळढोक बाबत नेहमीच जागृत असतात. माळढोक पक्षी साधारण: जुलै ते डिसेंबर या कालावधीत दिसून येतो. हा पक्षी दिसल्यानंतर नियमितपणे या पक्षावर वन विभागाकडून लक्ष ठेवून त्याची नोंद ठेवली जात असते.

    माहे जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापासून अभयारण्यातील संरक्षित क्षेत्रामध्ये माळढोक पक्षी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालत असताना आढळून आला. येथील कर्मचाऱ्यांनी माळढोक परत आल्याचा अंदाज व्यक्त केला. नंतर कर्मचाऱ्यांना माळढोक मादी गवतावरील किडे तसेच अन्य खाद्य खात असताना आढळून आली. त्यावेळी माळढोकचे चित्रीकरण ही वन्यजीव कर्मचाऱ्यांनी केले.

    माळढोक पक्षी अभयारण्यात मादी माळढोक सोबत दुसरा जोडीदार देण्याचा विचार सुरू असून लवकरच राजस्थान येथून तीन नर व दोन मादी आणण्याचे नियोजन आहे.  या अभयारण्यात माळढोकची संख्या वाढवण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. माळढोकची संख्या वाढली तर पुढील काळात या अभयारण्यात पक्षीप्रेमी पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत मिळेल, असे वाटते. 

    वन विभागाच्या सोयी सुविधा

    गवताळ माळरानाचा राजा अशी उपाधी असणारा व जगातील दुर्मिळ पक्ष्यांमध्ये समावेश असणारा माळढोक पक्षी पाहण्यासाठी दरवर्षी देशभरातून अभ्यासक व हौशी पर्यटक येतात. घनदाट झाडी, वाघ, सिंह, हत्तींचा वावर असलेले ठिकाण म्हणजेच जंगल ही प्रत्येकाची जंगलाबाबतची संकल्पना असते. परंतु उघड्या-बोडक्या माळरानाचे देखील जंगल असते याबाबतची जनजागृती होताना दिसत आहे. वन विभागाचे विश्रामगृह येथे असून पर्यटकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था येथे शासकीय दराप्रमाणे होऊ शकते. अभयारण्यात पर्यटकांसाठी बांबू हाऊस, टेंट हाऊस, पक्षी निरीक्षणासाठी लपणगृह, निरीक्षण मनोरेही वन विभागाच्या वतीने तयार करण्यात आले आहेत.

    त्यामुळे माळढोक पक्षी पाहणे व त्याचे निरीक्षण करणे तसेच अन्य वन्य पक्षाचे निरीक्षण करण्यासाठी पर्यटकांना वन विभागाकडून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होत असते. तसेच येथे आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नान्नजच्या या अभयारण्यात कायमस्वरूपी माळढोक पक्षाचा अधिवास वन विभागाच्या प्रयत्नाने झाल्यास या ठिकाणी कायम स्वरूप पर्यटकांची वर्दळ राहील व हे अभयारण्य देशाच्या पर्यटनाच्या नकाशावर येईल याची खात्री वाटते.         

    “बदलती पीक पद्धती व उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासाठी शेतकऱ्याकडून पिकावर होणारा कीटकनाशकांच्या अति वापर यामुळे माळढोक पक्षाचे खाद्य असलेल्या कीटकांचेही प्रमाण कमी होत चाललेले आहे. त्यामुळे या अभयारण्यातील माळढोकची संख्या कमी होत आहे. जुलै ते डिसेंबर दरम्यान माळढोक पक्षाचा नेहमी वावर असतो. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने अभयारण्यातील गवतही चांगल्या प्रकारे वाढलेले आहे. त्या गवतावरील किडे, नाकतोडे, उंदीर व अन्य कीटक खाण्यासाठी माळढोक पक्षी अभयारण्यात दरवर्षी येतो. माळढोकला पाहण्यासाठी पर्यटकांची संख्याही या कालावधीत वाढते. पर्यटकांना गाईड शिवाय अभयारण्यात फिरता येत नाही. तसेच माळढोकचे फोटोही विनापरवानगी काढता येत नाहीत.” 

    – श्री  दिलीप वाकचौरे, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव), पुणे.

    ” माळरानावरील गवताळ परिसंस्था हे सोलापूर जिल्ह‌्याचे वैभव असून या माळरानावरील ढोक म्हणजेच माळढोक हे त्याचे वैभव आहे. महाराष्ट्र बरोबरच राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा राज्यात त्याचा अधिवास दिसुन येतो. माळढोक चे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशिल असुन दरवर्षी पक्षी सप्ताह सारखे उपक्रम,पक्षी निरीक्षणे श्री. मारुती चितमपल्ली  यांच्या सारख्या आरण्यऋषीचे मार्गदर्शन व्याख्याने, लोक जागृती असे उपक्रम (स्थानिक स्वयंसेवी संस्था) सह  राबविले जातात. “

    – श्री.धैर्यशिल पाटील, उपवनसंरक्षक, सोलापूर

     

    – सुनील सोनटक्के

    जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *