• Sat. Sep 19th, 2026

Disha Salian Case : मातोश्रीच्या उंबरठ्यावर अब्रुनुकसानीची नोटीस, ठाकरेंना घरी जावूनच नोटीस का दिली? सतीश सालियन यांचे धमकीचे आरोप

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर आज चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन हे आपल्या वकिलांसह मातोश्री बंगल्याबाहेर आले. त्यांनी मातोश्रीच्या गेटवर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांना अब्रुनुकसानीची नोटीस दिली. यावेळी परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन हिच्या वडिलांनी तब्बल 500 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. सतीश सालियन यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुंबईच्या कलानगर येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या गेटवर जात आदित्य ठाकरे यांना नोटीस दिली. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मातोश्रीच्या गेटवरुन ही नोटीस स्वीकारली. दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर होती. तिच्या मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी या प्रकरणी आरोप केले होते.

आदित्य ठाकरे यांनी नुकतंच या प्रकरणी होत असलेल्या आरोपांवर आपली भूमिका मांडली होती. आपण दिशाला ओळखतही नसून तिच्यासोबत आपली कधीच भेट झाली नाही. चारित्र्यहनन करण्याच्या हेतून अशाप्रकारचे आरोप आपल्यावर केले जात असल्याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. तसेच उद्धव ठाकरे यांनीदेखील या आरोपांचं खंडन केलं होतं. ठाकरे पिता-पुत्रांनी भूमिका मांडल्यानंतर आज दिशाच्या वडिलांनी थेट ‘मातोश्री’च्या दारी जात अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे.

‘मातोश्री’च्या गेटवर सालियन आणि शिवसैनिक आमनेसामने

सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा मातोश्री बंगल्याच्या गेटवर गेले यावेळी तिथे काही गोंधळ उडालेला बघायला मिळाला. सतीश सालियन येण्यापूर्वीच मातोश्री बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यांनी सतीश सालियन आणि त्यांच्या वकिलांना विरोध केला. तसेच माध्यमकर्मींचीदेखील या परिसरात मोठी गर्दी बघायला मिळाली. यामुळे मातोश्रीच्या गेटबाहेर मोठी गर्दी जमा झालेली बघायला मिळाली. या सर्व गर्दी आणि गोंधळाच्या परिस्थितीत सतीश सालियन यांच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांच्या वकिलांना नोटीस दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी स्वाक्षरी करत ती नोटीस स्वीकारली. तसेच आपण ही नोटीस स्वीकारली असून वाचलेली नाही, असं आदित्य ठाकरे यांचे वकील माध्यमांना म्हणतात.

वकील निलेश ओझा काय म्हणाले?

“नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांना माफी मागावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच माफी न मागितल्यास 500 कोटींची भरपाई द्या. हे संविधान माझ्या हातात आहे. सर्वसामान्य व्यक्ती कुणापेक्षा कमी नाही. संविधानत सर्व एकसमान आहेत हे सांगण्यासाठी मी संविधान दाखवत आहे”, असं वकील निलेश ओझा म्हणाले.

दिशाचे वडील काय म्हणाले?

यावेळी पत्रकारांनी दिशाच्या वडिलांना पत्राद्वारे नोटीस देऊ शकले असते, मातोश्रीच्या दारावर येऊन नोटीस का दिली? असा प्रश्न विचारला. त्यावर सतीश सालियन यांनी प्रतिक्रिया दिली. “मला दाखवायचं होतं, तुम्ही माझ्या वकिलांना धमकी देतात. आदित्य ठाकरेंच्या माणसांनी माझ्या वकिलांना धमकी दिली होती की, तुम्ही लोकं कोर्टात येऊ शकत नाहीत”, असं सतीश सालियन म्हणाले.

नोटीसमध्ये काय म्हटलंय?

संबंधित नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांना सात दिवसांत माफी मागण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. माफी न मागितल्यास 500 कोटींची भरपाई द्यावी, असं नोटीसमध्ये म्हटल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. त्यावर सतीश सालियन यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरुनच त्यांनी आदित्य ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.