• Sat. Sep 19th, 2026

नवऱ्याचं अपहरण झालंय! पुणेकराची पत्नी पोलिसात, GFसोबत मलेशियाला चाललेल्या पतीचं बिंग फुटलं

मलेशियाला बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचं पत्नीला सांगून पुण्यातील व्यावसायिक मुंबईतील विमानतळावर पोहोचला. विमानात बसण्याआधी त्याच्या सोबत नाट्यमय प्रसंग घडला आणि सगळा बेत फसला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: पत्नी सोबत खोटं बोलल्यानं पुण्यातील व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं. एका बिझनेस ट्रिपच्या निमित्तानं मलेशियाला जात असल्याचं सांगून पुणेकर निघाला. पण प्रत्यक्षात तो त्याच्या एका मैत्रिणीसोबत सुट्टीसाठी मलेशियाला जात होता. पण पासपोर्टमुळे झालेला घोळ आणि पत्नीनं पोलीस ठाण्यात जाऊन केलेली अपहरणाची तक्रार यामुळे त्याचा डाव उधळला.

पुणेकर व्यावसायिक १४ सप्टेंबरला त्याच्या मैत्रिणीसोबत विमानतळावर पोहोचला. मैत्रिणीचा पासपोर्ट जुना होता आणि तो हरवल्याची तक्रार तिनं नोंदवलेली होती. तोच पासपोर्ट तिनं इमिग्रेशन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दाखवला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तिला रोखलं. या पासपोर्ट सोबत प्रवास करता येणार नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं. पुढील कार्यवाहीच्या भितीनं त्याची बोबडी वळली. पत्नी समोर बिंग फुटू नये यासाठी त्यानं इमिग्रेशनमधील अडचणींची खोटी कहाणी रचली. ही कहाणी सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी समोर आणली.

४६ वर्षांच्या व्यक्तीच्या पुण्यात लॉण्ड्रीचा मोठा व्यवसाय आहे. विमानतळावर चेकिंग सुरू असताना मैत्रीण पासपोर्टमुळे अडकताच व्यावसायिकानं पुढचा प्रवासच रद्द केला. त्यानं भितीनं मोबाईल स्विच्ड ऑफ केला. त्यानंतर तो त्याच्या प्रेयसीसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेला. तिथे असलेल्या लँडलाईनवरून त्यानं पत्नीला कॉल केला. इमिग्रेशनच्या समस्येमुळे मला माझा मोबाईल जमा करावा लागत असल्याचं त्यानं पत्नीला सांगितलं.

दुसऱ्या दिवशीही त्यानं पत्नीशी अतिशय त्रोटक संवाद साधला. त्यावेळीही त्यानं इमिग्रेशनची खोटी कहाणी ऐकवली. त्यानंतर त्याचा मोबाईल पूर्णपणे बंद झाला. बराच वेळ पतीशी संपर्क न झाल्यानं पत्नी घाबरली. तिनं पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू करताच प्रकरण उघडकीस आलं. बायकोसमोर सत्य येऊ नये यासाठी व्यावसायिकानं सगळी कहाणी रचल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

पत्नीनं अपहरणाची तक्रार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी व्यावसायिक सहार पोलीस ठाण्यात पोहोचला. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं. पत्नीला सत्य समजू नये यासाठी इमिग्रेशनची कहाणी रचल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली. त्यानंतर या सगळ्या नाट्यमय प्रकरणावर पडदा पडला.