• Sat. Sep 19th, 2026

Nandurbar Crime : 5 लाखांची सुपारी घेऊन जीव घेण्याचा प्रयत्न, नंदुरबारातलं चक्रावून टाकणारं प्रकरण

महेश पाटील, नंदुरबार : पैशांच्या वादातून मुकेश अर्जुन चौधरी यांची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी घेऊन नंदुरबारात आलेल्या दोन आंतरराज्य सुपारी किलरना नंदुरबार शहर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. संशयितांनी मुकेश चौधरी यांची रेकी करून त्यांच्या कारवर नंदुरबार-चौपाळा रस्त्यालगत फायरिंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, कारचा वेग अधिक असल्याने गोळी लक्ष्याला न लागता हवेत गेली. त्यानंतर पुन्हा हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी छत्रपती हॉस्पिटलच्या मागील मोकळ्या जागेतून ताब्यात घेतले.

ही कारवाई १८ सप्टेंबर २०२६ रोजी नंदुरबार शहर पोलिसांनी केली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे देवेंद्र गोकुळदास बैरागी (वय ३४, रा. फाजरपुरा, गाडीहाटा चौकाजवळ, उज्जैन, मध्यप्रदेश) आणि अभयासिंग मोहनसिंग चव्हाण (वय ४६, रा. घर क्र. २२१, निकास चौक, उज्जैन, मध्यप्रदेश) अशी आहेत. या कटातील सत्तार मोहन ठाकरे (रा. म्हसावद) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. इतर संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

नंदुरबार शहरातील तंत्रनिकेतनच्या बाजूला असलेल्या चौपाळे रस्त्यावर फायरिंग झाल्याची माहिती १८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता नंदुरबार शहर पोलिसांना मिळाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी आरोपींना तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हणमंत गायकवाड यांनी पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. पोउपनि. भुनेश मराठे आणि पोउपनि. अमोल देशमुख यांनी पथकासह शहरात संशयितांचा शोध सुरू केला. पोलिसांना छत्रपती हॉस्पिटलच्या मागील मोकळ्या जागेत दोन संशयित विनानंबर प्लेटच्या मोटारसायकलवर आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाण्याच्या तयारीत होते. संशयितांकडे पिस्तुले असल्याची माहिती असूनही पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी जीवाची पर्वा न करता शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.

Disha Salian Case : मातोश्रीच्या उंबरठ्यावर अब्रुनुकसानीची नोटीस, ठाकरेंना घरी जावूनच नोटीस का दिली? सतीश सालियन यांचे धमकीचे आरोपपंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल, तीन मोबाईल फोन आणि १ हजार ८०० रुपये रोख असा मुद्देमाल मिळून आला. याशिवाय म्हसावद-शहादा-नंदुरबार-निझर-तळोदा-अक्कलकुवा आदी मार्गांचा हस्तलिखित नकाशाही पोलिसांना मिळाला.

पैशांच्या वादातून हत्या करण्याचा कट

पिस्तुले, काडतुसे, नकाशा आणि विनानंबर प्लेट मोटारसायकल यामुळे पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यापासून त्यांच्याकडे असलेली पिस्तुले सत्तार ठाकरे (रा. म्हसावद), पंकज मिश्रा उर्फ दादु शेठ (रा. शहादा) आणि रवि डाबी (रा. उज्जैन, मध्यप्रदेश) यांच्या सांगण्यावरून आणण्यात आली होती.

Maharashtra TimesAdvocate Nilesh Ojha : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा कोण आहेत? वाचा A टू Z माहिती

हत्येची सुपारी का दिली?

मुकेश अर्जुन चौधरी यांचा पंकज मिश्रा आणि सत्तार ठाकरे यांच्याशी पैशांवरून वाद असल्याने त्यांची हत्या करण्याची सुपारी देण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

रेकी करून कारवर फायरिंग

संशयितांनी मुकेश चौधरी यांची रेकी केली. त्यानंतर त्यांच्या काळ्या रंगाच्या कारचा पाठलाग करून नंदुरबार-चौपाळा रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत ते थांबले. मुकेश चौधरी यांचे वाहन जवळ येताच आरोपींनी त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कारच्या दिशेने फायर केले. मात्र, वाहनाचा वेग अधिक असल्याने गोळी लक्ष्याला लागली नाही आणि हवेत गेली.

गोळीबाराचा प्रकार लक्षात न आल्याने मुकेश चौधरी पुढे निघून गेले. त्यानंतर आरोपी शहरात परतले आणि छत्रपती हॉस्पिटलच्या मागील भागात थांबून पुन्हा मुकेश चौधरी भेटल्यास हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हत्या झाल्यानंतर रायगडला मुक्कामाचे नियोजन

पोलिसांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. मुकेश चौधरी यांची हत्या केल्यानंतर सत्तार ठाकरे आणि पंकज मिश्रा उर्फ दादु शेठ यांच्या सांगण्यावरून आरोपींनी बेहरा शेठ, रा. रायगड, ता. उच्छल, जि. तापी (गुजरात) यांच्या घरी मुक्काम करण्याचे नियोजन केले होते. याबाबत बेहरा शेठ यांच्याशी चर्चा झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपींना नकाशा तयार करुन दिला होता

मुकेश चौधरी यांची हत्या करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन आरोपींना देण्यात आले होते. हत्येच्या कटासाठी कागदावर विविध मार्गांचे नकाशेही तयार करून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान या कटात सत्तार मोहन ठाकरे, रा. म्हसावद याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर नंदुरबार शहर पोलिसांच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले. देवेंद्र गोकुळदास बैरागी, अभयासिंग मोहनसिंग चव्हाण आणि सत्तार मोहन ठाकरे या तिघांना अटक करण्यात आली असून, कटातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

आरोपी विविध राज्यांशी संबंधित

अटक करण्यात आलेले संशयित मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राशी संबंधित असून, या प्रकरणाला आंतरराज्य गुन्हेगारीचे स्वरूप असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून या कटातील इतर व्यक्तींचा तसेच आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या संपर्कातील व्यक्तींचा तपास केला जात आहे.

Maharashtra TimesCrime News : एजंटची इतकी हिंमत? स्वत:ची कार सांगत 4 लाख 70 हजारात विकली, नंतर मध्यरात्री पळवून नेलीही कारवाई पोउपनि. भुनेश मराठे, पोउपनि. अमोल देशमुख, पोहेकॉ. प्रशांत पाटील, जगदीश पाटील, विशाल नागरे, विनोद जाधव, राजेश येलवे, नरेंद्र चौधरी, पंकज महाले, राजेंद्र धनगर, जितेंद्र तोरवणे, पोकॉ. राजेंद्र कटके, आनंद मराठे, रुपेश पगारे, ललित गवळी, राहुल राठोड, अमित भरवाड, नरेंद्र पाडवी, अनिल वसावे, विवेक ठाकरे, विनोद महाजन, विद्धेश्वर बिरारी, संदीप सदाराव आणि मपोकॉ. निंबा वाघमोडे यांनी केली.

या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. अमोल देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.