• Sat. Sep 5th, 2026

Crime News: शेअर मार्केटमुळे कंगाल, कर्ज फेडण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ पाहून टाकला दरोडा, पण अचानक एक जण आला अन् अजयच्या हातून आक्रित घडलं!

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जामगाव येथे काही दिवसांपूर्वी खून आणि दरोड्याची घटना घडली होती. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या खून आणि दरोड्याची घटना घडल्याने सोलापूर जिल्हा हादरला होता . गंभीर स्वरूपाच्या दरोड्याचा आणि खुनाचा छडा लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले असून अजयकुमार गौतम चव्हाण (वय 31 वर्षे, राहणार, लऊळ, ता माढा, जिल्हा सोलापूर) या संशयितास कर्नाटक राज्यातून अटक केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास केला असता, अजयकुमार चव्हाण याने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून कुलूप तोडण्याची शक्कल लढवली होती. सिरिंजद्वारे लोखंडी कुलूपमध्ये पेट्रोल टाकले, कुलुपाला आतून पेटवून दिले. आग लागल्याने कुलूपमधील लॉक आपोआप तुटले. घरात प्रवेश करून कपाटामधील ठेवलेले दागदागिने घेताना आवाज आला. घरात कोणीतरी प्रवेश केल्याची कुणकुण लागताच घरातील वृद्ध अशोक भीमण्णा मुळे (वय 61 वर्षे, रा. जामगाव ता. माढा, जिल्हा सोलापूर) यांनी विरोध केला. अजयकुमार चव्हाण याने अशोक मुळे यांच्या डोक्यात घातक शस्त्राद्वारे हल्ला केला, त्यातच वृद्ध अशोक मुळे यांचा खून केला आणि त्यानंतर 2 लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

शेअर मार्केट मध्ये 15 ते 20 लाखांचे कर्ज

संशयित आरोपी अजयकुमार चव्हाण याला शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले होते. साधारणतः 15 ते 20 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न अजय चव्हाण यासमोर पडला होता. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे ॲडिशनल एस पी विजय कबाडे यांनी अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेत माहिती देताना सांगितले की, अजयकुमार चव्हाण याने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला होता, मात्र त्याच घरातील एका वृद्धाचा खून केला. आरोपी अजयकुमार याचा सीसीटीव्हीच्या आधारे छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

स्टेट्स पाहून चोरीचा प्लॅन केला

अजयकुमार चव्हाण हा काही महिने माढा तालुक्यातील जामगाव येथे वास्तव्यास होता. मुळे कुटुंबाकडे मोठी संपती आहे, असे त्याला वाटत होते. मुळे कुटुंबीयातील एका सदस्याने तिरुपतीला जाणार आहे असे स्टेट्स ठेवले होते. स्टेट्स पाहून अजयकुमार चव्हाण याला वाटले घरातील सर्व सदस्य तिरुपतीला गेले. घराचे कुलूप पेटवून तोडले आणि घरात प्रवेश केला, त्यावेळी त्याने घरातील अशोक मुळे (61 वर्ष) या वृद्धास ठार केले आणि घरातील सर्व दागिने घेऊन पोबारा केला.

कर्नाटक राज्यातून आरोपीला अटक

जबरी चोरी आणि खून याची माहिती मिळताच माढा पोलिसांची टीम, एलसीबी टीमने सर्व अँगलने तपास केला. पोलिसांना सीसीटीव्हीचा मोठा आधार मिळाला, त्याद्वारे अजय कुमार यानेच खून आणि जबरी चोरी केल्याचं निष्पन्न झाले आहे. पोलिस शोधत असल्याची माहिती मिळताच अजयकुमार हा कर्नाटक राज्यात पळून गेला होता.

दरम्यान, ही कामगिरी संजय जगताप,( वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक/विजय शिंदे, बालाजी कांबळे, संजय राठोड व पथकातील अंमलदार सपोफौं/ नारायण गोलेकर, पोहेकॉ सलीम बागवान, रवि माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, आबासाहेब मुंढे, मपोहेका/ अश्विनी गोटे, पोकॉ। अनवर अत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, योगेश जाधव, सुरज रामगुडे, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, रतन जाधव, चापोकों/ सुनिल पवार, तसेच माढा पोलीस ठाणेकडील सपोनि / रोहित शिंदे, पोउपनि / मोहमद शेख व अंमलदार पोकॉ/ विवेक माने, सचिन देशमाने यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed