• Sat. Sep 5th, 2026

Solapur News : सोलापुरात 86 वर्षांच्या माजी नगरसेवकावर हल्ला, 25 वर्षांपूर्वीच्या वादाच्या रागातून आरोपीचं कृत्य

सोलापुरात सिंधी समाजाचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लालचंद वाधवाणी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीने 25 वर्षांच्या पूर्वीच्या रागातून हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : सोलापुरातील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत गुरुवारी सायंकाळी थरारक घटना घडली. सिंधी समाजाच्या एका कार्यक्रमासाठी गेलेले माजी नगरसेवक तथा सिंधी समाजाचे माजी अध्यक्ष लालचंद नमोमल वाधवाणी यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील गुरुनानक चौक परिसरारील सिंधी कॉलनीत घडली. या घटनेतील जखमी लालचंद वाधवाणी हे 86 वर्षांचे आहेत. ते सोलापुरात लक्ष्मी विष्णू सोसायटीत वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागचे कारणदेखील आता समोर आले आहे.

आरोपीने हल्ला का केला?

सिंधी समाजातीलच 65 वर्षीय प्रकाश किसनदास अडवाणी या इसमाने 25 वर्षांपूर्वीच्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी लालचंद वाधवानी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संशयित आरोपी प्रकाश अडवाणी याच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 109 (1), 352 (3) शस्त्र अधिनियम 4, 25 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Maharashtra TimesVidyanand Bapat : बापट कुटुंबात संस्कृत पठणाची परंपरा, विद्यानंद पूर्वी नास्तिक नव्हता, परिस्थितीने बदलला; आई-वडिलांनी आठवणी सांगितल्या

सिंधी समाजाच्या कार्यक्रमात थरार

सिंधी समाजातील एका व्यक्तीच्या उठावणाचा कार्यक्रम गुरुनानक चौक परिसरातील सभागृहात गुरुवारी सुरू होता. वाधवाणी यांच्यासह अनेक समाजबांधव तिथे उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच आरोपी प्रकाश अडवाणी दुचाकीवर तिथे आला. त्याने सोबत लांब धारदार शस्त्र आणले होते. कसलाही विचार न करता त्याने वाधवाणी यांना खाली ढकलून पायावर जोरदार वार केले. यात वाधवाणी गंभीर जखमी झाले.

उपस्थितांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि एकच गोंधळ उडाला. उपस्थित काही जणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता तो हातातील शस्त्र घेऊन तिथून निघून गेला. जखमी वाधवाणी यांना उपस्थितांनी रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

२५ वर्षापूर्वी जुन्या निर्णयाचा राग मनात होता

२५ वर्षांपूर्वी सिंधी समाजाच्या पातळीवर झालेल्या एका निर्णयावरून प्रकाश अडवाणी याच्या मनात तीव्र राग होता. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा संशय आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? याचा शोध पोलीस घेत आहेत. भर कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे सिंधी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.