MRTC Apli ST:एसटी महामंडळाने प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा ‘एसटी’ चे रनिंग स्टेटस समजावे , यासाठी एमएसआरटीसी आपली एसटी अॅप काढले. परंतु या ‘अॅप’मध्ये असंख्य त्रुटी व चुकीची महीती येत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.
एसटी गाड्यांची सद्यस्थिती प्रवाशांना कळावी, यासाठी व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस) आणि पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम (पीआयएस) सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. यासाठी ‘रोजमार्टा ऑटोटेक’सोबत करार करण्यात आला. त्यानुसार आपली एसटी मोबाइल ॲप तयार करण्यात आले.
‘आपली एसटी’ ॲप
एसटीचा ठावठिकाणा घरबसल्या कळावा, बस किती वेळात स्थानकात पोहोचणार याची माहिती मिळावी, यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने ‘आपली एसटी’ ॲप सुरू करण्यात आले. मात्र, त्यामधील तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांच्या अडचणीत भर पडत आहे.
अॅपमधील माहितीत त्रुटी
महामंडळाच्या प्रत्यक्ष सेवेत असलेल्या बसगाड्यांच्या तुलनेत ॲपवर कमी बसगाड्या दाखवण्यात येतात. अनेकदा एका मार्गावरील बसचा क्रमांकही चुकीचा दाखवला जातो. ॲपमध्ये सुरू होणारी वेळ आणि प्रत्यक्षातील वेळ यातदेखील तफावत आहे. एसटी वेळेवर रवाना झाल्यावर त्याची अद्यावत माहिती ॲपमध्ये मिळत नाही. दुसरीकडे, ॲपवर दाखवलेल्या वेळेआधीच एसटी धावत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. यामुळे एसटी स्थानक-आगारातील अधिकारी आणि प्रवासी यांच्यात अनेकदा वाद निर्माण होतो.
सुविधा केवळ नाममात्र
‘आपली एसटी’ ॲपमध्ये जवळचे बस स्थानक शोधण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र, ही सुविधा केवळ नाममात्र ठरली आहे. ‘बस स्टॅंड निअर मी’ यात प्रवाशांचे प्रत्यक्ष स्थान दाखवण्यात येत नाही. यामुळे जवळचे स्थानक शोधणे प्रवाशांसाठी अडचणींचे ठरत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या ॲपमध्ये अचूक स्थान दिसत नाही.
Mumbai Double Decker Bus: ‘उंच’ डबल डेकरला लाल सिग्नल, नव्या बसची उंची कमी ठेवण्याचे निर्देश
परस्परविरोधी माहिती
एखादी एसटी किती वेळेत स्थानकांवर पोहोचेल यासाठी ॲपमध्ये अपेक्षित आगमन वेळ देण्यात येते. अनेकदा अपेक्षित वेळ शून्य मिनिटे दाखवण्यात येते. प्रत्यक्षात १५ ते २० मिनिटांनंतर गाडी येते. विशेष म्हणजे, याबाबत स्थानक आणि आगारांतील नियंत्रण अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळत नाही. ॲपमधील माहिती आणि बस स्थानकांवरील प्रवासी माहिती प्रणाली (पीआयएस) फलकांवर परस्परविरोधी माहिती दिसते. ॲप प्रवाशांसाठी सोईचे कमी आणि त्रासदायकच अधिक ठरत आहे.
