• Thu. Sep 3rd, 2026

Dharashiv News : कुस्तीपटू म्हणून नावलौकिक असलेल्या महिलेचा तीन चिमुकल्यांसह किल्ल्यावरुन टोकाचा निर्णय, धाराशिव सुन्न

धाराशिवमध्ये सुन्न करणारी घटना घडली आहे. नळदुर्ग किल्ल्यावरून आईने तीन मुलांसह उडी घेतली. या घटनेत आईसह चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुली अत्यवस्थ आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव : धाराशिव जिल्हा गुरुवारी (3 सप्टेंबर) एका दुर्दैवी घटनेने हादरला. मुंबई हैदराबाद हायवेवरील नळदुर्ग येथील भुई कोट किल्ल्यातील उपल्या बुरुजावरून आई आणि तीन लेकरांसह उडी मारली. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत आई आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी मुलींना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अश्विनी भोसले असं मृतक महिलेचे नाव आहे. अश्विनी 30 वर्षांच्या होत्या. त्या उमरगा तालुक्यातील व्हांताळ येथील रहिवासी होत्या. त्यांनी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरुजावरून आपल्या तीन लेकरांसह उडी मारली. या घटनेत अश्विनी भोसले आणि एक मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

ही घटना समजतात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतक आणि जखमी मुलींना तात्काळ शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

मृतक अश्विनी यांचा कुस्तीपटू म्हणून नावलौकिक

ऐतिहासिक नळदुर्ग (ता. तुळजापूर, जि.धाराशिव) येथील किल्ल्यावरून कुस्तीपटू म्हणून नावलौकिक असलेल्या महिलेने तीन मुलांसह उडी मारली. गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. या दुर्घटनेत आईसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जखमींवर धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस काय म्हणाले?

याविषयी नळदुर्ग पोलिसांनी सांगितले की, व्हंताळ (ता. उमरगा, जि.धाराशिव) येथील रहिवासी (सासर अंबुलगा (ता. निलंगा, जि. लातूर) आश्विनी मोहिते (वय ३०) या शालेय जीवनापासून कुस्ती स्पर्धेत अव्वल क्रीडापटू म्हणून परिसरात ओळखल्या जात होत्या. गुरुवारी दुपारी त्यांनी नळदुर्ग किल्ल्यावरून तीन मुलांसह उडी मारली. त्यात आश्विनी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. दोन मुली गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेपूर्वी नेमके काय घडले? परिसरात त्यावेळी कोण उपस्थित होते? यासह अन्य बाबींचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

नळदुर्ग किल्ला धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी राज्य, परराज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. किल्ल्याच्या उंच कड्यांवर आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना कितपत आहेत? पर्यटक सुरक्षितता, सूचना फलक, सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही याबाबत आता प्रशासनाकडून तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.