• Tue. Sep 1st, 2026

Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, दोन पक्षांच्या गटनेत्यांमध्येच जोरदार राडा, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर महापालिकेत महायुतीच्या गटनेत्यांमध्येच राडा झाल्याचं बघायला मिळालं. शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं. या घटनेची सध्या कोल्हापुरात चांगलीच चर्चा होत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. महायुतीमधील दोन प्रमुख गटनेत्यांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. वादाचे स्वरूप इतके गंभीर होते की, दोन्ही नेते आक्रमक झाले आणि त्यांनी ‘चौकात चल, तिथेच तुला दाखवतो’ अशी थेट आव्हाने दिली. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वृक्ष प्राधिकरणाची बैठक आणि वादाची ठिणगी

कोल्हापूर शहरातील वृक्षतोड आणि घरांवर पडलेली झाडे काढण्याबाबतच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत काही प्रस्तावांना पाठिंबा तर काहींना विरोध होत असताना, ‘तुम्ही प्रत्येक गोष्टीला विनाकारण विरोध करता’ असा आरोप एका नेत्याने दुसऱ्यावर केला. यातूनच शाब्दिक चकमक सुरू झाली आणि त्याचे रूपांतर वादात झाले. दोन्ही नेते परस्परांना भिडल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाला आणि कामकाज थांबवावे लागले.

गेल्या काही महिन्यांपासून धुमसणारा वाद

देशमुख आणि फरास यांच्यातील हा संघर्ष नवीन नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्यांच्यात विविध कारणांवरून मतभेद सुरू आहेत. यापूर्वी महापालिका सभेत आणि परिवहन समितीच्या निवडणुकीतही हे दोन्ही नेते आमनेसामने आले होते. मध्यंतरी एका कार्यकर्त्याच्या मुद्द्यावरूनही त्यांच्यात धुसफूस वाढली होती. त्यातच वृक्ष प्राधिकरणाच्या मंगळवारच्या बैठकीत याच जुन्या वादाचा पुन्हा एकदा भडका उडाला आणि दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी देत शड्डू ठोकला.

समर्थकांची गर्दी आणि पोलिसांची मध्यस्थी

दोन्ही नेत्यांमधील वादाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच महापालिका चौकात दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली होती. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर महायुतीमधील इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra TimesTarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला

दोघांमध्ये फक्त वैचारिक मतभेद, वाद मिटेल : महापौर

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महापौर म्हणाल्या की, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आणि लोकहिताच्या प्रश्नांसाठी चर्चा करताना कधीकधी वैचारिक मतभेद होतात. “हा कौटुंबिक वाद असून महायुतीमधील हे दोन्ही नेते शहराच्या विकासासाठी एकत्र काम करत आहेत. ऐतिहासिक वारसा जपताना असे छोटे-मोठे संघर्ष होतात, मात्र ते लवकरच मिटवले जातील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण कोल्हापूर शहरात रंगली असून, महायुतीमधील हा अंतर्गत कलह आगामी काळात काय वळण घेतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.