• Sat. Aug 29th, 2026

दिवस सरले, आकडे फिरले! आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात ‘उलटा’ निकाल; काय सांगतो सर्व्हे?

मागील लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी महायुतीला जबर दणका दिला. भाजपच्या जागा २३ वरुन थेट ९ वर आल्या. सध्याची परिस्थिती पाहता लोकसभा निवडणूक झाल्यास कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील, याबद्दलचा सर्व्हे समोर आला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मागील लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं सत्ताधारी महायुतीला जबरदस्त दणका दिला. शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर झालेली पहिलीच निवडणूक सत्ताधारी महायुतीला जड गेली. भाजप च्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली. याचा फटका केंद्रात भाजपला बसला. भाजप बहुमतापासून दूर राहिला. तर महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. यानंतर गेल्या सव्वा दोन वर्षांत राज्यातील परिस्थिती बरीच बदलली आहे. या पार्श्वभूमीवर आज लोकसभा निवडणूक झाल्यास काय होईल, याबद्दलचा सर्व्हे करण्यात आला आहे.

आज लोकसभा निवडणूक झाल्यास केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार सत्तेत येण्याचा अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार, आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला ३२६, तर इंडिया आघाडीला १८५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला २९३, तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या होत्या. आता एनडीएच्या जागा वाढण्याचा आणि इंडिया आघाडीच्या जागा घटण्याचा अंदाज आहे.

२०२४ मध्ये महाराष्ट्रानं भाजप प्रणित एनडीएला जबर दणका दिला होता. भाजप ९, शिवसेना (शिंदे) ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १ अशा १७ जागा महायुतीला मिळाल्या होत्या. भाजपच्या जागा २३ वरून थेट ९ वर घसरल्या होत्या. यामुळे केंद्रात भाजपला फटका बसला. महाविकास आघाडीनं जोरदार घोडदौड करत महायुतीला घाम फोडला होता.

काँग्रेस १३, शिवसेना (ठाकरे) ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ८ यांच्या महाविकास आघाडीनं ३० जागांचा आकडा गाठला. सोबत एका अपक्ष खासदारानंही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानं हा आकडा ३१ वर पोहोचला. पण आज लोकसभा निवडणूक झाल्यास मविआला फटका बसण्याचा अंदाज आहे. सव्वा दोन वर्षांपूर्वी असलेली परिस्थिती आता नेमकी उलट होऊ शकते.

इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, आज लोकसभा निवडणूक झाल्यास महायुतीला ३१, तर महाविकास आघाडीला १७ जागा मिळू शकतात. महायुतीला ४९ टक्के, तर मविआला ४३ टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ २०२४ मध्ये लागलेल्या निकालाच्या अगदी उलट निकाल राज्यात दिसू शकतो.