• Sun. Aug 30th, 2026

Ketan Agarwal Sister Video : रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ केतन अग्रवाल याच्या आठवणीने व्याकूळ झालेली बहीण संजना हिला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील २५ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल याची नियोजित पत्नी सिया गोयल हिने लोहगड किल्ल्यावरुन ढकलून हत्या केल्याच्या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी केतनची २० वर्षीय बहीण संजना अग्रवाल हिला आपल्या भावाची कमतरता पुन्हा एकदा तीव्रतेने जाणवत आहे. आपल्या भावाच्या आठवणीने व्याकूळ झाल्याने संजनाला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या रक्षाबंधनाला प्रेमळ नातं साजरं करण्यासाठी केतन सोबत नसेल, त्याऐवजी केवळ त्याच्या आठवणी, फोटो आणि न्यायासाठीची अखंड प्रतीक्षा उरल्याचं ती म्हणते.

अपराधीपणाची भावना

“ही अपराधीपणाची भावना मी आयुष्यभर सोबत बाळगेन” असं म्हणत संजनाने आपल्या भावाला वाचवू न शकल्याचं दुःख व्यक्त केलं. तिने आठवण सांगितली की, एकेकाळी या दोघांनी केतनच्या लग्नात जल्लोष करण्याचे, एकत्र प्रवास करण्याचे आणि असंख्य आठवणी निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. ती म्हणते की, ती स्वप्ने अचानक धुळीस मिळाली.

संजनासाठी रक्षाबंधन हा आता तिच्या भावाच्या अनुपस्थितीची वेदनादायी आठवण करुन देणारा सण बनला आहे. इतर कुटुंबं जेव्हा बहीण-भावाचे नाते साजरे करत असतील, तेव्हा तिला मात्र केतनविना रक्षाबंधन साजरी करावी लागत आहे.

आरोपींना मिळणारी विशेष वागणूक आणि आरोपाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजना म्हणाली की, आता त्यांच्या कुटुंबातील सणांची जागा न्यायाच्या मागणीसाठी काढल्या जाणाऱ्या ‘कँडल मार्च’ने घेतली आहे. न्यायासाठीच्या या लढ्यात जनतेने आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहावे, असे भावूक आवाहन तिने केले. “या रक्षाबंधनालाही माझा भाऊ माझ्यासोबत नाही, पण आमचे नाते मात्र कायमस्वरुपी टिकून राहील.” असं ती म्हणाली.

संजना काय म्हणाली?

“मी माझ्या भावाचं रक्षण करु शकले नाही. ती केवळ त्याची लढाई नव्हती, ती माझीही होती. मी त्याला वाचवू शकले नाही. त्याबद्दलची अपराधीपणाची भावना आणि वेदना आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पण सध्या, मी फक्त न्यायाची वाट पाहत आहे. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे, की जर माझ्या भावाने किंवा कोणत्याही मुलाने एखाद्या मुलीसोबत असं काही केलं असतं, तर कदाचित आमचं संपूर्ण कुटुंब आतापर्यंत तुरुंगात असतं. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले असते.” असं संजना व्हिडिओत म्हणाली.

Maharashtra TimesNepal Flood : साहसी गिर्यारोहक डॉ. चितळेंसह 61 जणांचा ग्रुप बेपत्ता, मानसरोवर यात्रेवेळी संपर्क तुटला, क्लिनिकबाहेर नोट वाचून रुग्ण हवालदिल

मुलगी असल्याने सियाला व्हीआयपी ट्रीटमेंट

“समाज सहसा स्त्रियांची अधिक बाजू घेतो. पण तिला (सिया) केवळ मुलगी असल्यामुळे पाठिंबा आणि ‘व्हीआयपी’ वागणूक मिळत आहे. तिला तिच्या कुटुंबाचा आर्थिक पाठिंबा आहे. तिला अपराधीही वाटत नाही आणि मला वाटतं की याचं एकमेव कारण म्हणजे ती मुलगी आहे. आणि आम्ही पाहिलेली स्वप्नं, जी स्वप्नं मी माझ्या भावासाठी पाहिली होती—ती आता कधीच पूर्ण होणार नाहीत.” अशी खंत संजनाने व्यक्त केली.

वरातीऐवजी कँडल मार्च काढण्याची वेळ

“आम्ही कल्पना केली होती की आईही आमच्यासोबत येईल. आम्हाला वाटलं होतं, खूप मजा येईल; मला आणखी एक बहीण मिळेल. आम्ही प्रवासाचं नियोजन केलं होतं, केतनला प्रवासाची खूप आवड होती, अनेक ठिकाणी जायचे आणि छान वेळ घालवायचा असं ठरलं होतं. पण आता यातील काहीच घडणार नाही. केतनच्या लग्नाच्या वरातीत पुढे नाचण्याचं मी स्वप्न पाहिलं होतं; मला सर्वात जास्त नाचायचं होतं—तो ज्या घोड्यावर स्वार असेल, त्याच्या अगदी समोर नाचायचं होतं. त्याऐवजी, मला त्याच्यासाठी ‘कँडल मार्च’आयोजित करावा लागत आहे—माझ्या भावाला न्याय मिळावा यासाठीचा मोर्चा.” असं संजना म्हणते.

Maharashtra TimesDelhi Crime : दुसऱ्या तरुणाशी बोलते, मैत्रिणीला घरात घुसून संपवलं, फोन घेऊन पळाला, पोलिसांची जिम ट्रेनरसोबत चकमक“मला हे योग्य वाटत नाही. मला फक्त एवढीच आशा आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळेल. मी त्याला वाचवू शकले नाही, पण तो जिथे कुठे असेल, तिथे त्याला किमान हे तरी दिसेल की त्याला न्याय मिळत आहे, आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत. मी न्यायाची वाट पाहत आहे. कृपया आम्हाला पाठिंबा द्या.” अशी विनंती संजनाने केली आहे.