• Thu. Aug 27th, 2026

Shilpa Gaware : पुण्यात उच्चभ्रू कुटुंबांतील महिलेने स्वत:ला संपवलं, सासरच्यांवर हुंडा आणि छळाचे गंभीर आरोप

पुण्यात पुन्हा एकदा हुंडा आणि संपत्तीच्या वादातून एका उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : वाकड परिसरातील एका उच्चभ्रू कुटुंबातील विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शिल्पा सचिन गवारे (वय ४२) या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर मानसिक, शारीरिक छळ, पैशांची मागणी तसेच वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी शिल्पा यांच्या भावाने वाकड पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार संतोष गुलाब कलाटे यांनी दिलेल्या जबाबानुसार, शिल्पा यांचा विवाह सन २००९ मध्ये सचिन उत्तम गवारे यांच्यासोबत रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा ११ वी, तर लहान मुलगा तिसरीत शिक्षण घेत आहे.

शिप्ला यांच्या सासरच्यांवर आरोप काय?

तक्रारीनुसार, लग्नानंतर काही दिवसांनी शिल्पा यांच्या सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी त्रास देण्यास सुरुवात झाली. पती सचिन याला दारूचे व्यसन असल्याने ते दारू पिऊन शिल्पा यांना मारहाण करत असल्याचा आरोप आहे. तसेच सासू संजिवनी गवारे, सासरे उत्तम गवारे आणि दीर संदीप गवारे हेही शिल्पा यांना मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शिल्पा यांच्या वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सा मिळवून देण्यासाठी माहेरच्या लोकांकडून पैसे आणण्याचा दबाव तिच्यावर टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा यांनी त्यांच्या नवऱ्याच्या आणि सासरच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या त्रासाची माहिती माहेरच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर भावाने मध्यस्थी करून सासरच्या मंडळींना त्रास देऊ नये, अशी विनंती केली होती. काही वेळा पैशांची मागणी पूर्ण करूनही त्रास थांबला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

२७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली घटना

२७ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास संतोष कलाटे यांचे बंधू रंजीत यांना संदीप गवारे यांनी फोन करून शिल्पा आणि सचिन यांच्यात भांडण झाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीय ग्लोबल हॉस्पिटल, काळेवाडी फाटा येथे पोहोचले. तेथे शिल्पा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर शिल्पा यांनी बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे डॉक्टरांना सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, शिल्पाच्या कुटुंबीयांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून, तिच्यावर सातत्याने मानसिक व शारीरिक अत्याचार होत असल्याने तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.

पती याआधी चार वर्ष कारागृहात होता

विशेष म्हणजे, तक्रारीनुसार शिल्पाचे पती सचिन गवारे यांच्यावर यापूर्वी एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि ते जवळपास चार वर्षे कारागृहात होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, तक्रारीत सचिन गवारे, उत्तम गवारे, संजिवनी गवारे आणि संदीप गवारे यांच्याविरोधात मानसिक व शारीरिक छळ, पैशांची मागणी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व आरोपांची पोलीस तपासातून सत्यता स्पष्ट होणार असून, सध्या हे आरोप तक्रारीवर आधारित आहेत.