• Thu. Aug 20th, 2026

Shiv Sena Case : ठाकरेंना धनुष्यबाण पेलवले नाही, सुप्रीम कोर्टातील युक्तिवादावरुन प्रमोद जठार यांचा खोचक टोला

शिवसेना पक्ष आणि चिन्ह तसेच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सु्प्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादावरुन भाजप आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरून सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे. आता याच मुद्द्यावरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

भाजपच्या सेवा समन्वय अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, पंचायत समिती सदस्य भाऊ ईदाते ,भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे अक्षय फाटक, तालुकाध्यक्ष जया साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमोद जठार काय म्हणाले?

सुप्रीम कोर्टात सुनावणीत उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आता लक्षात आलं आहे की धनुष्यबाणही शिंदेंकडे जात आहे आणि म्हणूनच त्यांनी ते चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. यावरून लक्षात येतंय त्यांना धनुष्यबाण पेलवले नाही. आता तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या हाताखाली तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी पेलवलं. आता ज्याला पेलवलं त्याच्याकडे जाईल, असा विश्वास जठार यांनी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांना प्रमोद जठार यांनी सुनावले आहे.

जठार यांची संजय राऊतांवर खोचक टीका

आता उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या हातात काही राहिलेले नाही आणि म्हणूनच ते शिवसेना, भाजपवर टीका करतात. संजय राऊत रोज सकाळी उठल्यावर भैया रोज दुधाचा रतीब घालतो, त्याचप्रमाणे आता कोणतेच विषय राहिले नाही म्हणून मुख्यमंत्री बदलाचा विषयही पुढे आणतात, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांची जठार यांनी खिल्ली उडवली आहे.

Maharashtra TimesMLA Disqualification : आमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार, आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी, वाचा A टू Z युक्तिवाद

स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची मांडली भूमिका

कोकणात प्रकल्प यायचे तेव्हा येतील. मात्र आमच्या कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात तरुणांना शासनाच्या भरती पदाच्या संवर्गात स्थानिकांनाच न्याय मिळाला हवा. तो त्यांचा हक्क आहे. येथील बेरोजगारांच्या भविष्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून गावेच्या गावे खाली होत आहेत. घर बंद पडत चालली आहेत. त्यामुळे आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका जठार यांनी मांडली.

शिक्षकांसहित सगळ्यात विभागात केवळ कोकणातल्या स्थानिक युवा वर्गालाच न्याय देत 80 टक्के स्थानिक भरतीमध्ये आरक्षण असावं, अशी आमची सरकारकडे प्रमुख मागणी आहे. शासकीय भरतीतील जिल्हा संवर्ग पुनरुज्जीवित करण्यात यावा, या आरक्षणाचा कायदा आणण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणे ही आमची प्रमुख मागणी असल्याचा मुद्दा जठार यांनी मांडला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सध्या आमचे जनतेसाठी या सेवा समन्वय अभियान सुरू आहे. या अंतर्गत आमच्याकडे जनतेतून अनेक निवेदने, प्रश्न आले आहेत. त्याचा पाठपुरावा केला जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

कोकणातील भारतरत्न महर्षी कर्वे, भारतरत्न पा. वा. काणे, परमपूज्य साने गुरुजी यांचे दापोली तालुक्यातील मुळगाव असलेले अनुक्रमे मुरुड, खेड तालुक्यातील मुर्डे व साने गुरुजींचे पालगड या त्यांच्या गावांमध्येच क्लस्टर योजनेतून स्मारक आणि विकास करावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितल.

मत्स्यला शेतीचा दर्जा दिला. इतकंच नाही तर सिंधुदुर्गात आता जहाज बांधणीचा मोठा प्रकल्प सुरू होतो आहे. मुंबईत वॉटर टॅक्सी प्रकल्प आणला जातोय. मंत्री नितेश राणे आमचे डायनॅमिक मंत्री आहेत, अशा शब्दात प्रमोद जठार यांनी मंत्री नितेश राणे यांचं कौतुक केलं आहे.

Maharashtra TimesRajendra Singh Rana Case : ठाकरेंच्या वकिलांचा शेवटचा डाव, राणा प्रकरण ठरणार गेमचेंजर? शिंदे अडचणीत, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या A टू Z

भास्कररावांबाबत जठरांचे मोठे विधान

भास्कर जाधव यांना तुम्ही भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. तेच आता सध्या गुहागर विधानसभा मतदारसंघात रामरक्षा आंदोलनातून भाजपवरच टीका करत आहेत. यावर ते म्हणाले, जास्त टीका केली की समजायचं की तो माणूस त्या पक्षाच्या जवळ गेलेला आहे, असे सूचक विधान भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी केले.

विधान परिषद निवडणुकीतून ठाकरे गटाकडून माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केलेले रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांच्यावर भाजप पक्षप्रवेशाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, ते मोठे नेते आहेत. त्यांचा निर्णय प्रदेश पातळीवरून होईल. हा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांनी रोखला आहे का? यावर ते म्हणाले की, कोणीही रोखला नाही मात्र तो निर्णय प्रदेश पातळीवर होईल असे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले.