• Sun. Aug 16th, 2026

Sujay Vikhe Patil : डोनाल्ड वेडा माणूस, ट्रम्पमुळे महामार्गाचे काम रखडले, लोकं दारू जास्त प्यायला लागले, सुजय विखेंचा अजब दावा

भाजप नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम रखण्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच महामार्गाचे कामे रखडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मोबीन खान, शिर्डी : अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे नगर – मनमाड रस्त्याचे काम रखडले. त्याच्या अशा निर्णयामुळे लोकं दारू जास्त प्यायला लागले, तो वेडा माणूस असे म्हणत माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधत अजब दावा केला आहे. सुजय विखे यांच्या या विधानावर स्थानिक नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर – मनमाड महामार्गाचे सहा महिन्यापासून काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून शिर्डी ते अहिल्यानगर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आता तरी या मार्गाची साडेसाती संपेल, अशी नागरीकांना आशा होती. मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ठ कामामुळे नागरीकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. नव्याने तयार झालेल्या महामार्गावर लगेच मोठ मोठाले खड्डे पडत आहेत. तर अनेक किमीचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले?

नगर – मनमाडचे काम रखडण्यास थेट अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलाय. “मी अगोदरही बोललो असा वेडा माणूस एखाद्या देशाच नेतृत्व करतो आणि इराणवरील हल्ल्यामुळे क्रूड ऑईल सप्लाय देशात बंद झाला किंबहूना कमी झाला. क्रुड ऑईलची आवक घटल्यामुळे ऑईल रिफानरीज 50% मर्यादेवर काम करतात. क्रुड ऑईलपासून जेव्हा पेट्रोल – डीझेल बनवल्यानंतर त्याच बायप्रोडक्ट हे डांबर आहे. दुर्देवाने ऑईल रिफायनरीची क्षमता कमी झाल्याने क्रूड ऑईल कमी झाले आणि डांबर बनवण्याची क्षमता कमी झाली. ही मोठी लिंक आहे आणि म्हणून ट्रंप जबाबदार आहेत”, असा दावासुजय विखे पाटील यांनी केला.

‘ट्रम्प यांच्यामुळे दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली’

“जो माणूस सकाळी एक , दुसऱ्या दिवशी एक बोलतो, कधी म्हणतो युद्ध संपलं, लगेच दुसऱ्या दिवशी मिसायल टाकले जातात. या कारणांमुळे अनेक लोकांवर परिणाम झाला. जे दारू पितात त्यांची दारू पिण्याची संख्या वाढली. त्यांना कळेना हा वेडा काय म्हणतोय आणि काय नाही. मिसाइल पडले तर ते पुन्हा प्यायला सुरू करतात, असे देखील परिणाम आपल्याला भारतात पहायला मिळाले”, असे सुजय विखे पाटील यांनी म्हणाले आहेत.