• Sun. Aug 16th, 2026

Nagpur News : सिग्नलवर रस्त्याच्या मधोमध डान्स, व्हिडीओ पाहून नागपूरकर संतापले, पोलिसांनी बोलावून घेतलं, नंतर तरुण-तरुणीचा माफीनामा

रीलच्या नादात जीव धोक्यात घालणाऱ्या तरुण आणि तरुणीला नागपूर पोलिसांनी समज दिली आहे. यानंतर या युवक-युवतीने माफी मागण्याचा व्हिडीओ जारी झाला आहे. तसेच आपण संबंधित व्हिडीओ हटवला असल्याचं स्पष्ट केलं.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात वाहतुकीच्या सिग्नलवर रस्त्याच्या मधोमध उभे राहून रील बनवणाऱ्या युवक-युवतीला नागपूर पोलिसांनी चांगलीच समज दिली. रेडिसन चौक परिसरातील सिग्नलवर धोकादायक पद्धतीने रील बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांची दखल घेत त्यांना बोलावून घेतले. रस्त्यावर स्टंटबाजी करून स्वतःचा तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नका, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.

व्हायरल व्हिडीओत काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सिग्नलवर वाहने थांबलेली असताना युवक-युवती रस्त्याच्या मधोमध उभे राहून डान्स करताना आणि त्याचे चित्रीकरण करताना दिसत आहेत. काही सेकंदांच्या या रीलसाठी त्यांनी वाहतुकीच्या रस्त्यावरच स्टंटबाजी केल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात आले.

व्हिडीओ पाहून नागरिकांकडून संताप व्यक्त

हा व्हिडिओ indian takeovershowog या इंस्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक रस्ते आणि वाहतुकीचे सिग्नल हे रील किंवा स्टंटबाजी करण्यासाठीचे ठिकाण नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

नागपूर पोलिसांकडून समज

व्हिडिओची दखल घेत नागपूर पोलिसांनी संबंधित युवक-युवतीला बोलावून घेतले. यावेळी रीलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविताना वाहतुकीचे नियम पाळणे आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत पोलिसांनी दोघांना समज दिली. भविष्यात अशा प्रकारे रस्त्यावर जीव धोक्यात घालून रील अथवा स्टंटबाजी करू नये, असा इशाराही दिला.

युवक-युवतीचा माफीनामा

यानंतर युवक-युवतीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून नागपूरकरांची जाहीर माफी मागितल्याचे सांगितले. तसेच व्हायरल झालेली रील इंस्टाग्रामवरून हटविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संबंधित रील अद्याप सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान असे प्रकार कुणीही करु नये, असे आवाहन करण्यात आले.

असे रील बनवणाऱ्यांवर पोलिसांची कडक नजर

रील काही सेकंदांची असली तरी चुकीच्या पद्धतीने केलेली स्टंटबाजी जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असा संदेश नागपूर पोलिसांच्या या कारवाईतून देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून रील बनविणाऱ्यांवर यापुढेही लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.