• Thu. Aug 13th, 2026

    जळगावमधील कार्यक्रमता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला. पूर्वी भोळी-भाबळी लोकं होती, असं गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले. यावेळी व्यासपीठावरून एकाने म्हटले की, भाऊ तुम्ही देखील भोळे आहात. त्यावर गुलाबराव पाटील यांनी “मी भोळा नाही, अन्यथा मला भाजपवाल्यांनी खाऊन टाकले असते”, असा मिश्किल टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : “जुन्या लोकांनी हे सहकार वास्तू उभे करून दिले आहे. ते सुखरूप सुरू ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच आधी साधी-भोळी लोकं होती. रमेश चौधरी हे तीन वेळा त्यावेळी निवडून आले होते. अशांमुळे सहकार क्षेत्र संस्था या सुरू झाल्या. मी भोळा नाही. भोळा असतो तर मला भाजपवाल्यांनी खाऊन टाकले असते”, असा मिश्किल टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघात दिवंगत नेते जे टी महाजन यांच्या पुतळ्याच्या अनावरणा प्रसंगी भाषण करताना भाजपला लगावला.

    जिल्हा दूध संघ या ठिकाणी संस्थेचे संस्थापक दिवंगत माजी गृहराज्यमंत्री जीवराम तुकाराम महाजन यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार सुरेश भोळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. मंत्री गुलाबराव पाटील हे मुंबईवरून उशिरायाने आल्याने तब्बल कार्यक्रम दीड तास उशिराने सुरू झाला.

    ‘अन्यथा आपला कार्यक्रम होईल’

    यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्ष भाषणात बोलताना सांगितले की, “स्वर्गीय जे टी महाजन यांच्या पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. जेव्हा स्वर्गीय दादा मंत्री होते तेव्हा आम्ही शिवसेनेचे काम करत होतो. त्यांची अतिशय साधी राहणी होती. उच्चशिक्षित होते. त्यावेळी जिल्हा उद्योग शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी दूध संस्था त्यांनी उभारली.”

    “सहकारी संस्था, साखर कारखाने देखील त्यावेळी जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्था या सुरळीत चालत राहाव्या यासाठी त्यांनी चाव्या आपल्याकडे दिल्या आहेत. त्या सहकार संस्थांचा कार्यक्रम करू नका. अन्यथा आपलाच कार्यक्रम होईल’, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

    गुलाबराव पाटील यांचा मंगेश चव्हाण यांना टोला

    “आज जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद आहेत. जे जुने लोक होते त्यांनी सहकार साखर कारखाने सुरू केले होते. मात्र जिल्ह्यात एकही कारखाना सुरू नाही. पण खाजगी कारखाने काढतात आणि ते जोरदार चालतात. मंगेश दादांचा बाहेर देखील एक प्रायव्हेट कारखाना होता. तो जोरात चालत होता. मात्र इकडे बेलगंगा कारखाना कसं काय चालत नाही? हे देखील बघितले गेले पाहिजे”, असा टोला गुलाबराव पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना लगावला.

    ‘सहकार क्षेत्रात यायचे नव्हते’

    “या सहकार क्षेत्राकडे मला मुळीच यायचे नव्हते. ते जबरदस्ती मला या क्षेत्राकडे टाकले गेले. कारण या क्षेत्रात सही करताना विचारून सही करावी लागते. आता तुम्ही विचारून सही करता की नाही? विचारून सही करत जा”, असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित संचालकांना दिला. “मी शंभर वेळा या गेटवरून ये-जा करत असतो. मात्र या गेटकडे बघत सुद्धा नाही. कारण या क्षेत्रात यायचे नव्हते. त्यामुळे हे मंगेश दादाला देऊन टाकले आहे. तूच सांभाळू शकतो”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

    पाटील यांच्याकडून तुकाराम मुंढे यांचं कौतुक

    “एक तुकाराम मुंढे आला तर काय होते, हे आपण सर्वांनी बघितले आहे. राज्यात कुठे पनीर दिसत नाही, दूध देखील फेडरेशनला वाढत आहे. त्यामुळे एक चांगला अधिकारी आणि प्रशासक बसला तर काय होते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मी येथील मिटींगचा भत्ता देखील घेत नाही. फक्त केव्हातरी कार्यकारी संचालकांना कॉल लावतो. माणसे लावण्यासाठी किंवा गाडी लावायची असेल तर कॉल करतो. त्यानंतर मी कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना फोन करीत नाही”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा