• Thu. Aug 13th, 2026

    मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ७७.९७% गणना प्रपत्र प्राप्त – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 13, 2026

    मुंबई, दि. १३ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू असून, घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ रोजी संपत आहे. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी आतापर्यंत ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० (७७.९७ टक्के) मतदारांचे गणना प्रपत्र भरून व स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहे.

    गृहभेटीनंतर १ कोटी ८७ लाख ५६ हजार २३१ (१९.१७ टक्के) मतदार ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ (Uncollectable EF) या प्रवर्गात नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सापडू न शकलेले किंवा गैरहजर ६३ लाख ६१ हजार ११३, कायमस्वरूपी स्थलांतरित ७१ लाख ९५ हजार ३८८, मृत ३३ लाख ९४ हजार ५३, अन्यत्र नोंदणी केलेले अथवा दुबार १६ लाख ६२ हजार १२१ आणि इतर प्रवर्गातील १ लाख ४३ हजार ५५६ मतदारांचा समावेश आहे.

    एकूण मतदारांपैकी ९ कोटी ५० लाख ५५ हजार ५९१ (९७.१४ टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून, २७ लाख ९८ हजार ४५८ (२.८६ टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही अद्याप बाकी आहे.

    ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ प्रवर्गातील मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत किंवा प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे.

    या याद्यांमध्ये नाव असलेल्या मतदारांच्या वास्तव्याबाबत मतदार किंवा बीएलए यांनी संबंधित बीएलओ यांना माहिती दिल्यास प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचे गणना प्रपत्र १७ ऑगस्टपर्यंत भरून घेता येणार आहे. याबाबत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना १२ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली असून, संबंधित बीएलए यांनी याद्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed