• Thu. Aug 13th, 2026

    ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा – मंत्री संजय राठोड – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 13, 2026

    मुंबई, दि. १३ : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन करून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

    मंत्री संजय राठोड म्हणाले, ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर-आधारित ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी मीडियाने #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSaveWater या हॅशटॅगचा वापर करावा. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे.

    ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा

    १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मृद व जलसंधारण विषयावर ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची थीम ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ अशी आहे. स्पर्धकांनी सोशल मीडियावर #SaveSoilSaveWater या अधिकृत हॅशटॅगचा वापर करणे आवश्यक आहे. एकाच हॅशटॅगखाली विक्रमी संख्येने रील्स तयार होऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डिजिटल सहभाग नोंदविला जाईल, असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

    या स्पर्धेसाठी पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धकाने रील स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला टॅग करणे बंधनकारक आहे. यासाठी अधिकृत #SaveSoilSaveWater हॅशटॅगचा वापर करणे अनिवार्य राहील.

    मृद व जलसंधारण विभागाचे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्स पुढीलप्रमाणे आहेत :

    Instagram: https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en
    Facebook: https://www.facebook.com/mahawalkathon2026/
    X (Twitter): https://x.com/MahaWalkathon26

    0000

    गजानन पाटील / विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed