Chhatrapati Sambhajinagar News : वाळूज एमआयडीसीत ‘कमवा अन् शिका’ योजनेतील प्रशिक्षणार्थी आक्रमक; बजाज ऑटोच्या गेटवर काम बंद आंदोलन
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाज ऑटो कंपनीच्या गेटवर विद्यार्थी प्रशिक्षणार्थींच्या वतीने अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. पदवी आणि आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत तीन वर्षांचे काम पूर्ण केल्यानंतर पदवी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशनच झाले नसल्याचा खळबळजनक आरोप आंदोलकांनी केला आहे. ज्यांचे ॲडमिशन झाले नाही, त्यांची तीन वर्षे पूर्ण होऊनही त्यांना डिग्री मिळालेली नाही. कमवा आणि शिकाच्या नावाखाली कामगारांप्रमाणे काम करून घेऊन केवळ स्टायपेंडवर राबवून घेतले जात असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.विशेष म्हणजे, २०२४ मध्येच अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे नामंजूर झाली असतानाही त्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती आणि जुलै २०२६ मध्ये ही बाब समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना तातडीने डिग्री देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी विद्यार्थ्यांनी बजाज ऑटोच्या मुख्य प्रवेशद्वारावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे.