• Tue. Aug 11th, 2026

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वडापाव खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पायाला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या मारहाणीत छातीत बुक्क्या मारल्यानंतर घरी जाऊन झोपलेल्या तरुणाचा अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात रविवारी दुपारी घडली.

    शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय २४, रा. गणेश पेठ) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

    किरकोळ कारणावरुन होणाऱ्या वादातून हाणामारी किंवा खून होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे दिसत आहे.

    वडापावच्या गाडीवर पायाला धक्का लागल्याने वाद

    शिवम आणि वैभव हे दोघेही गणेश पेठ परिसरात राहत असून, त्यांची तोंडओळख होती. वैभव एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरी करतो. दोघांचेही वडील रिक्षाचालक आहेत. रविवारी दुपारी गणेश पेठेतील वडापावच्या गाडीवर दोघे आले होते. त्या वेळी एकमेकांच्या पायाला धक्का लागल्याने त्यांच्यात वाद झाला. सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद वाढल्यानंतर मारहाण झाली. वैभवने शिवमच्या छातीत जोरात बुक्क्या मारल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Ahmedabad Crime : केस विंचरत लिफ्टने गच्चीवर गेला, फेऱ्या मारताना खेचून विद्यार्थिनीवर अत्याचार, 27 वर्षीय सुरक्षारक्षकाला अटक, सहा दिवसांपूर्वीच लागलेला नोकरीला

    अंतर्गत रक्तस्रावाने मृत्यू झाल्याचं समोर

    मारहाणीनंतर शिवम घरी गेला आणि झोपला. रात्री उशिरापर्यंत तो उठला नसल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

    घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले; तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून माहिती घेतली. त्यानंतर वैभवला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने शिवमसोबत वाद झाल्याचे सांगितले.

    भाच्याच्या सासऱ्याचा खून; आरोपीला अटक

    दुसरीकडे, भाच्याचा विस्कटलेला संसार आणि त्यातून निर्माण झालेल्या वादाचा राग मनात धरून पुण्यात एकाने भाच्याच्या सासऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना महंमदवाडी परिसरात लक्ष्मी पार्कजवळील फॉरेस्टच्या डोंगरावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर आरोपी काळेपडळ पोलिस ठाण्यात हजर झाला आणि खुनाची कबुली दिली.

    सैफन बाबूलाल सय्यद (वय ४३, रा. हडपसर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महिला पोलिस अंमलदार विजया जयदीप चव्हाण (वय ३७) यांच्या तक्रारीवरून हनुमंत कांबळे (वय २५, रा. महंमदवाडी) याला अटक करण्यात आली आहे.

    भाच्याच्या मृत्यूनंतर सून नीट वागत नसल्याचा राग

    सैफन सय्यद यांची मुलगी सना हिचा विवाह आरोपी कांबळे याचा भाचा लखन काळोखे याच्याशी झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी लखनचा मृत्यू झाला. त्यानंतर सना सासरी व्यवस्थित राहत नसल्याच्या कारणावरून कुटुंबात वाद सुरू होते. रविवारी सासरच्या मंडळींसोबत झालेल्या वादानंतर सना रागाच्या भरात जंगलाच्या दिशेने निघून गेली. मुलीचा शोध घेण्यासाठी सैफन सय्यद आणि हनुमंत कांबळे हे दोघे डोंगराकडे गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला आणि यातूनच सैफन यांचा खून करण्यात आला.

    Maharashtra TimesCrime News : 19 वर्षीय प्रेयसीचा जीव घेतला, 20 वर्षीय प्रियकराला पळून जाताना विमानतळावर अटक, रिलेशनमध्ये असताना अत्याचाराचा संशय

    पुण्यात वाढते खून

    दरम्यान, पुणे शहरात किरकोळ वाद, पूर्ववैमनस्य आणि गँगवॉर यामुळे खुनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नुकत्याच समोर आलेल्या पोलीस अहवालानुसार, वर्षाला साधारण ७९ हून अधिक खुनाचे गुन्हे शहरात नोंदवले जात आहेत. त्यामुळे यावर वेळीच तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed