• Thu. Aug 6th, 2026

    Raj Thackeray : ताटकळत ठेवल्याने संतापले, गोल्ड मेडलिस्ट खेळाडू राज ठाकरेंची भेट न घेताच कोचसह निघून गेला

    Raj Thackeray : ताटकळत ठेवल्याने संतापले, गोल्ड मेडलिस्ट खेळाडू राज ठाकरेंची भेट न घेताच कोचसह निघून गेला

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेला खेळाडू दिलीप गावित आपल्या कोचसह आला. पण बराच वेळ भेटीसाठी ताटकळत ठेवल्याने राज ठाकरेंना न भेटताच निघून जाणं खेळाडू आणि कोचने पसंत केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांची आज नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या दरम्यान राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे संतापल्याचं बघायला मिळालं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅराअथलेट 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलेला दिलीप गावित हा खेळाडू दिव्यांग आहे.

    दिलीप गावित आपल्या कोचसह राज ठाकरे यांच्या भेटीसाठी नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे आले होते. पण राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत होते. यामुळे त्यांना जवळपास एक ते दीड तास बसवून ठेवण्यात आले. यामुळे गोल्ड मेडलिस्ट दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे यांनी राज ठाकरेंची भेट न घेताच निघून जाणे पसंत केले.

    मनसे पदाधिकाऱ्यांकडून मनधरणी प्रयत्न

    दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे निघून जात असताना मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी प्रकरण्याचे प्रचंड प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलं नाही. याउलट त्यांनी तिथून निघून जाणं पसंत केलं. भेट द्यायची नाही मग बोलावलं कशाला? असा सवाल करत कोच काळे आणि दिलीप गावित परतले.

    राज ठाकरे महाराष्ट्राचे नेते, मात्र आम्ही देखील महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काहीतरी केले आहे, अशी खंत व्यक्त करत कोच काळे निघून गेले. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली.

    Nashik News

    कोच वैजनाथ काळे नेमकं काय म्हणाले?

    “काही नाही झाले. सर थोडे बिझी होते. आता नंतर भेटू. आम्ही नाराज वगैरे काही नाहीत. शेवटी आपण महाराष्ट्राचे आहोत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सर्व केलेलं आहे. राज ठाकरे थोडे बिझी होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. काही हरकत नाही. आम्ही नंतर भेटू”, अशी प्रतिक्रिया कोच वैजनाथ काळे यांनी माध्यमांना दिली.

    “राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो होतो. पण थोडासा वेळ लागतोय. आमची ट्रेनिंगची वेळ झालेली आहे. आम्ही नाराज वगैरे नाही. शेवटी महाराष्ट्र आणि देशासाठी काम केलेलं नाही. आम्ही बराच वेळ बसलो होतो. त्यामुळे दिलीपला खेळाडूंचा अपमान होतो, असं जाणवलं. आम्ही खूप वेळ झाला, बसलो होतो. राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरु आहे. त्यामध्ये ते बिझी आहेत”, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.