मुंबई, दि. 1 : महसूल विभागाच्या सेवा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ हे शासन आणि जनता यांच्यातील परस्पर संबंध अधिक घट्ट करणारा उपक्रम आहे. ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेपुढे जाऊन नागरिकांच्या तक्रारी व अर्जांवर समाधानकारक कार्यवाही करण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
मुंबई शहर जिल्ह्यात दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले. या अभियानातील अंतिम शिबिराचे आयोजन १८७-कुलाबा विधानसभा मतदारसंघातील रामा आणि सुंदरी वाटूमल सभागृह, के. सी. महाविद्यालय, चर्चगेट येथे करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर रयतेसाठीचा संघर्ष, न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी केलेले कार्य आठवते. त्यांच्या विचारांवर आधारित सक्षम महसूल व्यवस्था निर्माण करण्याचे काम शासन करीत आहे. महसूल विभाग हा शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागांपैकी एक असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचा थेट संबंध आहे. मालमत्ता नोंदणीपासून दुष्काळ, पूर आदी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पंचनामे करण्यापर्यंत अनेक महत्त्वाची कामे महसूल विभागामार्फत केली जातात, असे नार्वेकर यांनी सांगितले.
कुलाबा विधानसभा मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या विविध स्तरातील नागरिक वास्तव्यास आहेत. प्रत्येक नागरिकाला शासनाच्या सेवा सहज आणि पारदर्शकपणे मिळणे आवश्यक आहे. या शिबिरामुळे नागरिकांचा वेळ वाचत असून विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. देश विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करीत असताना सक्षम आणि लोकाभिमुख महसूल व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी नमूद केले.
एक लाख नागरिकांपर्यंत समाधान शिबिराच्या माध्यमातून पोहोचलो – जिल्हाधिकारी आंचल गोयल
मुंबई शहर जिल्ह्यात २२ जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे एक लाख नागरिकांपर्यंत पोहोचता आले. महसूल दिनाच्या दिवशी या अभियानातील अंतिम शिबिर होत असून, नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.
एप्रिल ते जून या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख नागरिकांना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले.१ ऑगस्ट महसूल दिनानिमित्त मागील वर्षीचा लेखाजोखा सांगतांना, जिल्ह्याला ४९० कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे ७७९ कोटी रुपयांची महसूल वसुली करण्यात आली असून, निर्धारित उद्दिष्टाच्या १६० टक्के कामगिरी जिल्ह्याने साध्य केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या वर्षभरात महसूल विभागाच्या कामकाजात संगणकीकरणावर विशेष भर देण्यात आला. प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची आवश्यकता भासू नये आणि त्यांना आवश्यक सेवा सुलभपणे मिळाव्यात, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त विशेष टपाल आवरणाचे अनावरण
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमात विशेष टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले. भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून या ऐतिहासिक टप्प्याची नोंद करण्यात आली.
भारतीय टपाल विभागाच्या,जीपीओ निर्देशक रेखा रिजवी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त विशेष आवरण आणि स्मरण टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या १०० वर्षांत लोकाभिमुख प्रशासनाची महत्त्वपूर्ण परंपरा जपली आहे. हे विशेष टपाल आवरण पुढील पिढ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी या ऐतिहासिक वाटचालीची आठवण ठरेल. जिल्हाधिकारी कार्यालयाची यशस्वी वाटचाल पुढेही सुरू राहो, अशी शुभेच्छा त्यांनी दिल्या.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाची १०० वर्षांची गौरवशाली वाटचाल
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. शतकभराच्या या वाटचालीत महसूल प्रशासन, नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाची भूमिका बजावणे, मालमत्ता व महसूलविषयक कामकाज तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
