• Sun. Sep 13th, 2026

Jalgaon Crime : माणूस म्हणावं की हैवान? दारु पिण्यासाठी पत्नीकडे पैसे मागितले, नकार दिल्याने तिला संपविले, भडगावमध्ये मन हेलावणारी घटना

Jalgaon Crime : माणूस म्हणावं की हैवान? दारु पिण्यासाठी पत्नीकडे पैसे मागितले, नकार दिल्याने तिला संपविले, भडगावमध्ये मन हेलावणारी घटना

जळगावच्या भडगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीला संपवलं आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका नराधम पतीने पत्नीला थेट जीवे मारलं आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. आरोपी पतीला पत्नीबद्दल काहीच कसे वाटले नाही? तो आपल्या पत्नीला इतकं निर्घृणपणे कसं संपवू शकतो? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

संबंधित घटना ही भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून पतीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (26 जुलै) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आरोपी पतीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

ललिता आत्माराम राठोड (वय 36) असं मृत महिलेचं नाव आहे. आत्माराम पतीलाल राठोड (वय 40, रा. वसंतवाडी तांडा) असे आरोपीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात आत्माराम राठोड याने घरातील धारदार चाकूने ललिता यांच्या पोटावर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. यानंतर महिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगावच्या ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला.

आरोपी पतीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी मृतक महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी आत्माराम राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार पुढील तपास करत आहेत.