• Thu. Jul 23rd, 2026
    पुण्यात तरुणाला संपवलं, आरोपींची बोनेटला बांधून धिंड; लेक गमावलेल्या माऊलीचा संताप, चपलांनी बदडण्याचा प्रयत्न

    Pune Minor Boy Murder : आरोपींना पोलिसांच्या गाडीच्या बॉनेटवर बसवून दोरीने बांधून त्यांची धिंड काढली. यावेळी पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या मृत तरुणाच्या आईने संतापाच्या भरात आरोपींवर झेप घेऊन त्यांना चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कात्रज तलाव परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाची कोयत्याने ३० वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी सात अल्पवयीन आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

    कोयत्याचे सपासप वार

    या प्रकरणात एकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि संबंधित तरुण कात्रज तलाव परिसरातील एका हॉटेलसमोर थांबले होते. त्या वेळी दोन दुचाकींवरून सात अल्पवयीन आरोपी तेथे आले. त्यांनी तरुणाला अडवून कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.

    तीस सेकंदात तीस वार

    अवघ्या तीस सेकंदात डोके, चेहरा आणि छातीवर सुमारे ३० वार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात जखमी तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक तपासात मृत तरुणाविरोधात खुनाचा प्रयत्न केल्यासह सहा गुन्ह्यांची नोंद होती. त्याचा एका अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाशी काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यातून तरुणाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

    तीन-चार महिन्यापूर्वी हत्येचा कट

    तीन ते चार महिन्यांपूर्वी त्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या खुनामागील नेमके कारण आणि इतर आरोपींची भूमिका तपासली जात आहे. भारती विद्यापीठ पोलिस तपास करत आहेत.

    मृताच्या आईकडून आरोपींना चपलेने मारहाणीचा प्रयत्न

    खून प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आणत असताना तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आरोपींना पोलिसांच्या गाडीच्या बॉनेटवर बसवून दोरीने बांधून त्यांची धिंड काढल्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे. या वेळी पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या मृत तरुणाच्या आईने संतापाच्या भरात आरोपीवर झेप घेऊन त्याला चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.