Nitin Gadkari: पुण्यातील नव्या प्रकल्पांचं भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या ताणामुळे पुरंदर तालुक्या नवे पुणे विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रस्तावित विमानतळाजवळ हे शहर असेल.
‘देशातील काही शहरांमध्ये लोकसंख्येची वाढ मर्यादित ठेवण्याचा विचार करावा लागेल; अन्यथा रस्ते आणि पूल कितीही बांधले, तरी भविष्यात रस्त्यावर चालणेही कठीण होईल. त्यामुळे पुरंदरच्या दिशेने नव्या पुण्याचा विकास करणे आवश्यक आहे,’ असे गडकरी म्हणाले.
Dive Ghat Twin Tunnels: दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?
दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणार
पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांची उभारणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ‘भारतीय रस्ते काँग्रेसच्या निकषानुसार दोन खांबांमधील अंतर ३० मीटर असते; मात्र मलेशियातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पांमध्ये हे अंतर १२० मीटर ठेवले जाणार आहे. त्यामुळे खांबांची संख्या कमी होऊन प्रकल्पाचा खर्चही कमी होणार आहे. या मार्गांमध्ये तळाला सामान्य रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वांत वर मेट्रो मार्ग अशा त्रिस्तरीय रचनेचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक गरजांचा विचार करून दर्जेदार पायाभूत सुविधा उभारल्या जातील,’ असे त्यांनी नमूद केले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून पुणे परिसरात सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांना वर्षभरात गती मिळणारआहे. प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषणातही घट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने विविध स्तरांवर सहकार्य केल्यामुळे या प्रकल्पांना गती मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे आभार मानले.
प्रवासात वेळ वाचणार
‘शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या दोन तासांत, तर छत्रपती संभाजीनगर-नागपूर प्रवास अडीच तासांत होईल. त्यामुळे पुणे-नागपूर हे अंतर सुमारे साडेचार तासांत पार करणे शक्य होईल,’ असे गडकरी यांनी सांगितले. या महामार्गातील काही अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाशिक फाटा-खेड महामार्गाला मंजुरी देण्याची गरज भाषणात मांडली. त्यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, ‘या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तयार आहे. मात्र, वित्त विभागाने शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू करता येणार नसल्याचे नमूद केले आहे. उर्वरित भूसंपादन पूर्ण होताच पुढील काही दिवसांत या प्रकल्पालाही सुरुवात केली जाईल.’
Pune News: पुण्यातील उन्नत महामार्गांसाठी २५ वर्षे टोल; पुणे-शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव-शिक्रापूर मार्गांचा विकास होणार
गडकरींचे महत्त्वाचे संकेत
पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार.
नन्हे-रावेत उन्नत महामार्गाचा डीपीआर तयार असून, लवकरच कामाला सुरुवात होणार.
पुणे-मुंबईदरम्यान आणखी एक द्रुतगती महामार्ग उभारला जाणार असून, पहिल्या टप्प्याची निविदा तीन महिन्यांत काढली जाणार.
ठाणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामालाही लवकरच प्रारंभहोणार.
