• Thu. Sep 3rd, 2026

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 3, 2026

नवी दिल्ली, दि. ३ : नवी दिल्ली येथील ‘भारत इलेक्ट्रिसिटी, पॉवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक २०२६’ या जागतिक परिषदेच्या ऊर्जा प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाइनच्या पुरस्काराने मंगळवारी(दि.1) रोजी गौरविण्यात आले. केंद्रीय विद्युत आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील यशोभूमिमध्ये येथे १ ते ३ सप्टेंबरपर्यंत आयोजित ‘भारत इलेक्ट्रिसिटी, पॉवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक २०२६’ परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य ‘फोकस स्टेट’ म्हणून सहभागी झाले आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात राज्याने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सादरीकरण या परिषदेतील लक्षवेधक प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे व त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार,  महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी., महाऊर्जाचे महासंचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनात चारही संस्थांचे संयुक्त प्रदर्शनी दालन या परिषदेत उभारण्यात आले आहे. महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक गडकिल्ल्यांची ओळख तसेच हरित ऊर्जेतील प्रवासाचा संगम साधून या दालनाची रचना करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे चित्र आणि तंत्रज्ञानावर आधारित हरित ऊर्जेच्या भविष्याकडे होणारा प्रवास दालनातून दाखविण्यात येत आहे.

ऊर्जा विभागाच्या या दालनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘इंटरअॅक्टिव्ह टच वॉल’ला मोठा प्रतिसाद मिळाला. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा यांच्या प्रमुख योजना, प्रकल्प आणि यशाची माहिती या डिजिटल माध्यमातून देण्यात आली. तसेच ‘इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन’वर ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाच्या माध्यमातून या चारही संस्थांचे यश आणि विविध उपक्रम डिजिटल स्वरूपात दाखवण्यात आले. यासह ‘इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन’मधून घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये व्हर्च्युअली फेरफटका मारता आला. या दालनात ‘सेल्फी बूथ’ देखील आकर्षण ठरले आहे. इंटरअॅक्टिव्ह तंत्रज्ञान, व्हर्च्युअल अनुभव, डिजिटल माहिती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित रचना यामुळे हे दालन माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण ठरले आणि परिषदेतील सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाईनच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed