- टोलमाफीसाठी थेट दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना संपर्क
रायगड-अलिबाग,दि.३ : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच गणेशभक्त व सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. तसेच गणेशोत्सव काळात या ठिकाणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांबाबतचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते. नागोठणे उड्डाणपुलावरील वाहतुकीचे नियमित निरीक्षण करा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्री श्री.भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, वाहतुकीचा प्रवाह अबाधित राहील आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवावे. वाहतुकीच्या स्थितीचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार तातडीने उपाययोजना कराव्यात. या संपूर्ण कालावधीतील वाहतूक व्यवस्थापनाचा दैनंदिन अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
माणगाव व इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करा
पनवेल ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप या मार्गावरील कामांचा आढावा घेताना मंत्री श्री. भोसले यांनी माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण होतील, याची कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश दिले. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता उत्तम राहील, याची विशेष नोंद घेऊन कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक देखरेख ठेवावी, असे त्यांनी सांगितले. महामार्गाचे काम करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच वाहतुकीवर त्याचा अनावश्यक परिणाम होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महामार्गावर सुविधा केंद्रे उभारून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरून मोठ्या संख्येने प्रवासी व वाहनांची ये-जा होणार असल्याने आवश्यकता असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तेथे सुविधा केंद्रे उभारावीत, अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. या सुविधा केंद्रांवर स्वच्छता, वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा यासह प्रवाशांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशा प्रमाणात चलत स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पर्यायी मार्गांची चाचपणी करून अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवा
महामार्गावर वाहतुकीचा भार वाढल्यास वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची चाचपणी करण्यात यावी, असे मंत्री श्री.भोसले यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार अंतर्गत रस्त्यांचा वापर करता यावा, यासाठी संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवावेत. ऐन गणेशोत्सव काळात रस्त्यांची गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्वीच पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. वाहतूक, रस्ते, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, यावर त्यांनी भर दिला.
या बैठकीस शरद राजभोज, सचिव, रस्ते, श्री.शेलार,सचिव राष्ट्रीय महामार्ग राजाराम गोसावी, मुख्य अभियंता, कोकण विभाग विवेक बडे, अधीक्षक अभियंता, रायगड, मिलिंद कुलकर्णी, अधीक्षक अभियंता रत्नागिरी, डॉ.रूपाली सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
0000000