Hydrogen Train: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचं लोकार्पण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नेरळ-माथेरानदरम्यान धावणाऱ्या माथेरानच्या राणीचं रुपांतर हायड्रोजन ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
कोणत्या रेल्वे मार्गांचा समावेश?
रेल्वे मंत्रालयाच्या ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात माथेरान हिल रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे. देशातील ऐतिहासिक रेल्वेमार्गांचा वारसा जपत त्यांना प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाची जोड देण्याचा भारतीय रेल्वेचा हा प्रयत्न आहे. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. माथेरानसह कालका-शिमला, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, कांग्रा व्हॅली, बिलीमोरा-वाघई, पाताळपानी-कालाकुंड आणि मारवाड-गोरम घाट या हेरिटेज रेल्वेमार्गांचा या योजनेत समावेश आहे.
Central Railway: मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढणार, CSMT-कल्याण, कर्जत मार्गावर दहा फेऱ्या; वेळापत्रक कसं असेल?
प्रत्येक हायड्रोजन ट्रेनसाठी सुमारे ८० कोटी रुपये, तर हायड्रोजन निर्मिती व इंधन भरण्याच्या सुविधांसाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज निर्माण होत असल्याने या तंत्रज्ञानातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
धूर व प्रदूषण कमी होणार
नेरळ ते माथेरानदरम्यान सुमारे २१ किलोमीटरच्या अरुंदमापी मार्गावर धावणारी ही रेल्वे सध्या डिझेल इंजिनावर चालते. भविष्यात हायड्रोजन इंजिनाचा वापर झाल्यास पर्यावरण संवेदनशील माथेरानमध्ये धूर व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी माथेरान हिल रेल्वेचे ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवून तिला इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजन तंत्रज्ञानावर चालविण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे ऐतिहासिक रूप कायम ठेवत ‘माथेरानची राणी’ आधुनिक आणि पर्यावरणपूरक ऊर्जेवर धावण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
मात्र हायड्रोजन इंजिन प्रत्यक्ष सेवेत कधी दाखल होणार, याबाबत अद्याप निश्चित वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तरीही देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या यशानंतर माथेरान हिल रेल्वेकडे आता नव्या आशेने पाहिले जात आहे.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थिती देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचं हरयाणामधील जिंद-सोनिपत मार्गावर लोकार्पण करण्यात आलं. जर्मनी, जापान, चीन आणि अमेरिकेसारख्या देशांनंतर भारतातही हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन दहा डब्यांची आहे. यापैकी दोन डबे हायड्रोजन ड्रायव्हिंग पावर कार असतील आणि आठ डबे प्रवाशांसाठी असतील.
Kandivali Railway Terminus: मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनस उभारण्याची तयारी, कांदिवलीमध्ये जमीन निश्चित; प्रकल्पासमोर एक अडथळा
कोणत्या देशांमध्ये सेवा सुरू आहे?
जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनीमध्ये सुरू झाली होती. १७ सप्टेंबर २०१७पासून या देशात हायड्रोजनवर चालणारी ट्रेन धावते आहे. त्यानंतर चीनमध्ये २०१९ मध्ये ही हायड्रोजन ट्रेन सुरू केली पण ऑगस्ट २०२४ मध्ये ही ट्रेन बंद करण्यात आली. त्यानंतर चीनमध्ये जानेवारी २०२६ मध्ये हायड्रोजन ट्रेनच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. याशिवाय जापान आणि इटलीमध्येही हायड्रोजन ट्रेनवर काम सुरू आहे. जापानमधील ट्रेन २०२७ च्या शेवटी तर इटलीमधील हायड्रोजन ट्रेन २०२७ च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, कॅनडा, ऑस्ट्रिया आणि पोलांड देशांमध्येही चाचण्या सुरू आहेत.
