• Sat. Jul 18th, 2026
    पुण्यातील उन्नत महामार्गांसाठी २५ वर्षे टोल; पुणे-शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव-शिक्रापूर मार्गांचा विकास होणार

    Pune Elevated Roads: पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अनेक मार्गांचं बांधकाम सुरू केलं आहे. येत्या चार वर्षांमध्ये तीन महत्त्वाच्या मार्गांमुळे शहरातील प्रवास वेगवान होणार आहे. पण या मार्गांवर २५ वर्षे टोल आकारला जाईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते शिरूर, हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण- शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांच्या कामासाठी १८ हजार कोटींचा खर्च येणार आहे. पुढील चार वर्षांत हे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या महामार्गांसाठी प्रत्येक रस्त्यावर प्रतिकिलोमीटर नऊ रुपयांप्रमाणे २५ वर्षांसाठी पथकर (टोल) आकारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज, शनिवारी या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे.

    ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून ‘आरेखन-बांधकाम-वित्त-संचलन आणि हस्तांतर’ या सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर हे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. तिन्ही रस्त्यांसाठी सुमारे १०० हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. यातील दोन रस्त्यांवर मेट्रोचा समावेश आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य अभियंता रणजित हांडे, कार्यकारी अभियंता अनिल सगर या वेळी उपस्थित होते. “तिन्ही महामार्गाचे काम एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण रस्ते बंद नसतील; तसेच अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक वळविण्यात येणार आहे,” अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

    Maharashtra TimesPune News: शहरांत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना वेग, पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गांवर वेळ वाचणार; कुठे-कसे असतील मार्ग?

    पुणे-शिरूर

    पुणे-शिरूर या ५३.४० किलोमीटर सहापदरी उन्नत द्रुतगती महामार्गाची सुरुवात वाघोलीपासून होणार असून, कोंढापुरीपर्यंत हा महामार्ग उन्नत असेल. त्यानंतर सहा किलोमीटर जमिनीवर, त्यानंतर पुन्हा दोन किलोमीटर उन्नत आणि त्यानंतर अडीच किलोमीटर जमिनीवरील रस्ता असेल. पुढे दोन किलोमीटर उन्नत महामार्ग असेल. शिरूर बायपासजवळ हा महामार्ग संपेल. या रस्त्यासाठी ४५ ते ५० हेक्टर भूसंपादन करावे लागणार असून, ७,५१५ कोटींचा खर्च येणार आहे. उन्नत महामार्गावर सहा आणि जमिनीवरील रस्त्यावर दोन असे आठ टोल असतील.

    हडपसर ते यवत

    हडपसर ते यवत हा ३१.५० किलोमीटरचा महामार्ग २५ किलोमीटर सहापदरी उन्नत, तर साडेसहा किलोमीटर जमिनीवरून सहापदरी असेल. रस्त्याची सुरुवात हडपसर गाडीतळापुढील रवीदर्शन चौकापासून होणार असून, सहजपूरपर्यंत उन्नत, त्यानंतर यवतपर्यंत जमिनीवरील सहापदरी मार्ग असेल. रवीदर्शन ते कोरेगाव मूळजवळील बाह्य रिंग रोडपर्यंत १७.७६ किलोमीटरची मेट्रोसाठी मार्गिका असेल. या महामार्गासाठी ५,२६२ कोटींचा खर्च येणार असून, १५ किलोमीटरचे भूसंपादन आवश्यक आहे. उन्नत मार्गिकेवर तीन व जमिनीवर दोन असे पाच टोल असतील.

    Maharashtra TimesPune News: कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम पुन्हा लांबणीवर, सात वर्षांपासून पुणेकर वाहतूककोंडीत; २०२७पर्यंत प्रतीक्षा

    तळेगाव-चाकण-शिक्रापूर

    तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५३.२० किलोमीटर रस्त्यासाठी चाकणपर्यंत २६.३० किलोमीटरचा चारपदरी उन्नत, तर शिक्रापूरपर्यंतचा २७ किलोमीटरचा मार्ग जमिनीवरील चारपदरी असेल. यासाठी ५,२०० कोटींचा खर्च येणार असून, सुधावाडीजवळ बाह्य रिंग रोड, तर शिक्रापूरजवळ पुणे-शिरूर सहापदरी उन्नत महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासाठी ४० हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार असून, उन्नत मार्गासाठी तीन, तर जमिनीवरील रस्त्यासाठी दोन असे पाच टोल असतील. असतील. खराडी बायपास ते विठ्ठलवाडी ही मेट्रोसाठी स्वतंत्र मार्गिका असेल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा