• Thu. Jul 16th, 2026

    Akola News : अकोल्यात 3 नगरसेवकांचे पद रद्द, काँग्रेस, MIM आणि शरद पवार गटाला मोठा धक्का

    Akola News : अकोल्यात 3 नगरसेवकांचे पद रद्द, काँग्रेस, MIM आणि शरद पवार गटाला मोठा धक्का

    अकोल्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांचे पद अपात्र ठरले आहे. अवैध जात प्रमाणपत्राचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : अकोला महापालिकेतून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांना मोठा झटका बसला आहे. अकोला महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांवर अवैध जात प्रमाणपत्रामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित झालेल्या नगरसेवकांमध्ये अमरीन सदफ सय्यद नाझीम, सीमा अंजुम शेख अनिस, शेख अब्दुल्ला शेख सलीम यांचा समावेश आहे.

    निलंबित झालेले अमरीन हे प्रभाग क्रमांक 16 ब येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निवडून आले होते. तर सीमा अंजुम शेख अनिस या प्रभाग क्रमांक 2 अ येथून एमआयएमच्या तिकीटावर निवडून आले होते. तर शेख अब्दुल्ला शेख सलीम यांनी प्रभाग क्रमांक 1 अ मधून काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला होता. पण या तीनही नगरसेवकांचे नगरसेवक पद आता जात वैध प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन अपात्र ठरलं आहे. त्यामुळे या तीनही नगरसेवकांसाठी मोठा झटका मानला जात आहे.

    नगरसेवक पद अवैध ठरवण्यामागील नेमका आरोप काय?

    या तीनही नगरसेवकांची जातीची प्रमाणपत्र अवैध असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईनंतर हे तीनही नगरसेवक उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी हा आदेश दिला आहे. या तीनही नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल त्यांनी दिला आहे. हे तीनही नगरसेवक आरक्षित जागांवर निवडून आले होते.

    महापालिका आयुक्त सुनील लहाने काय म्हणाले?

    “अकोला महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ज्यांनी आरक्षित असलेल्या प्रभागात निवडणूक लढली, पण ज्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हते, त्यांनी जात पडताळणी समितीकडे आपलं जात प्रमाणपत्र सादर केले. याबाबत काही प्रकरणांचा निकाल प्राप्त झाला आहे. निवडून आलेल्या तीन नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं जात पडताळणी समितीने घोषित केलं आहे. त्याअनुषंगाने तीनही नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त सुनील लहाने यांनी दिली.

    नगरसेवक न्यायालयात घेऊ शकतात धाव

    तीन नगरसेवकांवर ही कारवाई करण्यात आल्यामुळे आता त्या प्रभागात आगामी काळात निवडणूक होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. तीनही नगरेसवक आगामी काळात न्यायालयात या प्रकरणी दाद मागू शकणार आहेत. त्यामुळे त्यांना जर न्यायालयातून दिलासा मिळाला तर त्यांना पुन्हा नगरसेवक पदाची जबाबदारी मिळणार आहे. या प्रकरणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडणार? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.