Crime News: माझ्या पश्चात कुटुंबाला कोणताही त्रास झाल्यास त्याला सर्वस्वी बाळा शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असतील, असा आरोपही खलील शेख यांनी केला आहे.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये रवींद्र धंगेकरांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजीत दराडे, पुणे : पुन्हा एका आत्महत्याच्या घटनेनं पुणे शहर हादरलं आहे. पुण्यातील गुलटेकडी परिसरात एका कंत्राटदाराने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. गुलटेकडी परिसरात वास्तव्यास असलेल्या खलील शेख या विकासकाने गळ्याला फास लावून आपलं जीवन संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे, शेख यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करत त्यामध्ये पुण्यातील अनेक राजकीय नेत्यांची नावं घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत एका बांधकाम प्रकल्पात व्यावसायिक भागीदारी असल्याचंही शेख यांनी नमूद केलं आहे.
आत्महत्येपूर्वी खलील शेख यांनी मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये आपण प्रचंड आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे आणि कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य पुण्यातील लक्ष्मी रोड परिसरातील एका जागेवर इमारतीचे काम करण्यासाठी ‘उत्कर्ष असोसिएट’ नावाची संस्था उभारण्यात आली होती. यात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, सुनील आहेर यांचा मुलगा, हमीद शेख यांचा मुलगा, रघु गौडा आणि स्वतः खलील शेख हे भागीदार होते. या प्रकल्पासाठी बँकांकडून मोठा निधी कर्जरूपाने उचलण्यात आला होता. मात्र, संबंधित जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करत या कामाला स्थगिती देण्यात आली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने बांधकाम पूर्णपणे रखडले आणि पर्यायाने शेख यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला.
खलील शेख यांनी टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या भागीदारांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या आर्थिक अडचणींकडे डोळेझाक केली. उत्कर्ष कंपनीकडून एका मंजूर बिलाचे २० लाख रुपये आणि इतर दोन बिलांचे ३० लाख असे एकूण ५० लाख रुपये येणे बाकी होते. या अडकलेल्या ५० लाख रुपयांवर खलील स्वतः गेल्या तीन वर्षांपासून तब्बल ४ टक्के दराने व्याज भरत होते. बाळा शेडगे यांनी पैसे देण्याऐवजी गुंडगिरीची भाषा वापरली. व्यवसायात अडथळे आणण्याची तसेच पुण्यात जगणे कठीण करण्याची धमकी दिली, असा आरोप शेख यांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. शेख यांचा मृत्यू वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने झाल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच, संबंधित जागेचा आणि वक्फ बोर्डाचा आता कोणताही कायदेशीर संबंध उरलेला नाही, असा दावाही त्यांनी केला. जेव्हा या प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस आली होती, तेव्हाच आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘अशा चुकीच्या कारवायांमुळे अनेक व्यावसायिक नैराश्यातून आत्महत्या करतील’, असा स्पष्ट इशारा दिला होता, अशी आठवणही धंगेकर यांनी करून दिली. अचानक काम रखडल्यामुळेच हा पूर्ण प्रकल्प कोलमडला आणि सर्वांचे मोठे नुकसान झाले, असे त्यांनी नमूद केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा