• Wed. Sep 2nd, 2026

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 15, 2026
महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद

मुंबई, दि. १५:- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, मुंबई शहर व उपनगर मार्फत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.  या योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी ऑन लाइन अर्ज सादर करावेत असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सहाय्य व सामाजिक उन्नतीच्या उद्देशाने महामंडळ विविध स्वयंरोजगाराभिमुख योजना राबवत आहे. प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या स्वयंपूर्णतेला चालना देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या योजनांद्वारे करण्यात येत आहे.

लाभार्थ्यांनी https://mpbcdc.maharashtra.gov.in किंवा  https://mahadisha.in या संकेतस्थळाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरावेत. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. अपूर्ण अथवा कागदपत्रांविना सादर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

५० टक्के अनुदान योजना – एकूण प्रकल्प खर्च ५०,०००/-, महामंडळाचे अनुदान  २५,०००/-, बँक कर्ज २५,०००/-.  या योजनेद्वारे लघु व्यवसाय, सुक्ष्म उद्योग व उपजीविकेस पूरक अशा उपक्रमांना चालना दिली जाते.

बीज भांडवल योजना – प्रकल्प खर्च ५०,००१/- ते ५,००,०००/-, महामंडळ सहभाग. २० टक्के (जास्तीत जास्त ५०,०००/- अनुदान + बीज भांडवल ५०,०००), बँक सहभाग ७५ टक्के ३,७५,०००/- (बँकेच्या विद्यमान व्याजदराने कर्ज),  लाभार्थी सहभाग: ५ टक्के  २५,०००/ आणि

कर्ज परतफेडीचा कालावधी  ३ ते ५ वर्ष आहे.  या योजनेद्वारे उद्योजकता विकसित करण्यासाठी उपयुक्त असून, लाभार्थ्यांना स्थिर व टिकाऊ व्यवसाय उभारता येतो.

थेट कर्ज योजना – महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १००,०००/- पर्यंत कर्ज वार्षिक ४ टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाते. ही योजना जलद व सुलभ पद्धतीने अंमलात आणली जाते. ज्यामुळे अल्पावधीतच लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करता येतो.  या योजनेसाठी प्रकल्प खर्च १००,०००/-, महामंडळ सहभाग : ५० टक्के (अनुदान जास्तीत जास्त ५०,०००/-), थेट कर्ज रक्कम ४५ टक्के (४५,०००/-), लाभार्थी सहभाग ५ टक्के (५,०००/-) असा आहे.

या योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांनी मुदतीत ऑनलाइन अर्ज करून शासनाच्या स्वयंरोजगार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

०००००

एकनाथ पोवार/स.सं

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed