• Thu. Sep 3rd, 2026

अकरावी प्रवेशासाठी १६ जुलैपासून पुढील फेरी; सुधारित वेळापत्रक जाहीर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 14, 2026
अकरावी प्रवेशासाठी १६ जुलैपासून पुढील फेरी; सुधारित वेळापत्रक जाहीर – महासंवाद

मुंबई, दि. १४ : अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नियमित तीन फेऱ्या आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 16 जुलै पासून पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या फेरीत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंद करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जाहीर वेळापत्रकानुसार 16 जुलै दुपारी 3 वाजेपासून 18 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-2 भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. या फेरीसाठी प्रवेश वाटप प्रक्रिया 19 जुलै रोजी पार पडणार असून 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता प्रवेश यादी आणि कट-ऑफ जाहीर करण्यात येणार आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 20 जुलै ते 22 जुलै या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

त्यानंतर 23 जुलै रोजी माहिती प्रक्रिया करण्यात येऊन 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरू होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed