• Thu. Jul 2nd, 2026
    Mumbai News : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; BMCच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन, कंत्राटदार ब्लॅकलिस्ट

    Mumbai Man falls in Manhole: कुर्ल्यात मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर BMCने मोठी कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी चार अधिकारी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : कुर्ला- साकीनाका मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

    नेमकं काय घडलं होतं?

    आज दुपारी कुर्ल्यातील साकीनाका परिसरातील खैरानी मार्गावर मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्याचवेळी मोबाईलवर बोलत पायी जाणारे ५५ वर्षीय असलम इसाक शेख यांचा तोल जाऊन ते उघड्या मॅनहोलमध्ये पडले. महापालिका आणि अग्निशमन दलाच्या पथकाने त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    कोणा-कोणावर कारवाई?

    या घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहायक/दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगुले आणि सहायक अभियंता उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित केले. याशिवाय, सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला दुचाकी आडवी लावली, छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेच्या अंधारात संतापजनक प्रकार

    ७ दिवसांत अहवाल, १० लाखांची मदत

    घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, मृत असलम शेख यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली आहे.

    सर्व मॅनहोलची होणार तपासणी

    या घटनेनंतर महापालिकेने सर्व विभागांना मॅनहोलवरील कामांदरम्यान चारही बाजूंनी बॅरिकेड्स उभारणे सक्तीचे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पुढील आठ दिवसांत मुंबईतील सर्व मॅनहोलची शंभर टक्के तपासणी करून त्यांच्या सुरक्षिततेचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा