• Fri. Jun 26th, 2026

    वडिलांना सियाबद्दल सतत एकच प्रश्न; एकदा ‘ते’ नावही घेतलेलं; केतनला धोक्याची जाणीव झालेली?

    वडिलांना सियाबद्दल सतत एकच प्रश्न; एकदा ‘ते’ नावही घेतलेलं; केतनला धोक्याची जाणीव झालेली?

    Pune News: २४ वर्षीय बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालचा लोहगडावरुन खाली पडून शेवट झाला. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन पोलिसांच्या अटकेत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: व्यावसायिक केतन विशाल अग्रवालचा लोहगड किल्ल्यावरुन पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा सगळा प्रकार अपघाताचा वाटत होता. केतन त्याच्या होणाऱ्या पत्नीसह १८ जूनला किल्ल्यावर ट्रेकिंगला गेला होता. सेल्फी काढत असताना सोसाट्याचा वारा आला आणि केतनचा पाय घसरला, असा घटनाक्रम त्याची होणारी पत्नी सिया गोयलनं कथन केला. पण पोलीस तपासात ही माहिती खोटी निघाली. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं केतनला कड्यावरुन ढकललं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

    केतन आणि सिया नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार होते. त्यांच्या शाही विवाहासाठी कुटुंबानं राजस्थानात राजवाडा बुक केला होता. केतनच्या अकस्मात मृत्यूनं त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला आहे. केतननं सियाबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘फेब्रुवारीत दोघांचा साखरपुडा झाला. त्यानंतर ते अनेकदा भेटायचे, सोबत फिरायला जायचे. पण केतननं सियाबद्दल बऱ्याचदा चिंता बोलून दाखवली होती. तुम्ही सियाची पार्श्वभूमी नीट तपासलीय ना, हा प्रश्न त्यानं अनेकदा आम्हाला विचारला. सियाचं कुटुंब आमच्या नातेवाईकांच्या परिचयाचं होतं. त्यामुळे आम्ही त्याला निश्चिंत राहण्यास सांगितलं होतं,’ असं केतनच्या वडिलांनी सांगितलं.
    Maharashtra TimesPune Crime: सियाचा विचित्र हट्ट, चाणाक्ष संजनाचे प्रश्न अन् चेतनची हुशारी अंगाशी; 5 चुकांमुळे सिया गजाआड
    ‘केतन आणि सियामध्ये अनेकदा लहानसहान गोष्टींवरुन वाद व्हायचे. सिया बराच वेळ मोबाईलवर घालवायची. केतननं एकदा ‘ चेतन चौधरी ‘चं नावदेखील घेतलं होतं. त्यामुळे संशय निर्माण झाला होता. त्यांचे संबंध असल्याची शंका आली होती. सिया अवघ्या २० वर्षांची असल्यानं कुटुंबानं सोयरिक नाकारण्याचाही विचार केला होता. पण मुलीच्या आई, वडिलांच्या हट्टामुळे आम्ही लग्नाला होकार दिला. सियाला केतनसारखा मुलगा मिळणार नाही, असं तिचे आई, वडील म्हणाले होते,’ असं केतनच्या वडिलांनी सांगितलं.
    Maharashtra TimesPune Crime: चेतनला अनेकांचे कॉल, पण समोरुन भलताच आवाज; ‘त्या’ 640 मिनिटांमुळे केतनचे मारेकरी सापडले
    २४ वर्षीय केतन त्याच्या कौटुंबिक व्यवसायात सक्रिय होता. सक्सेस समूहात तो संचालक होता. बांधकाम व्यवसायात हा समूह काम करतो. अमेरिकेच्या बबसन कॉलेजमधून केतननं पदवी घेतली होती. त्यानंतर तो २०२३ मध्ये पुण्यात परतला. मामाच्या मध्यस्थीनं त्याचं लग्न जमलं. फेब्रुवारीत त्याचा साखरपुडा झाला होता. नोव्हेंबरमध्ये त्याचं लग्न होतं. त्यासाठी उदयपूरमध्ये राजवाडा बुक करण्यात आला होता.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा