• Tue. Jun 23rd, 2026
    या लोकांना ताकदवान लोक नकोत, गुलाम हवेत, पक्ष सोडताच संजय दिना पाटलांनी तोफ डागली

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे सहाही बंडखोर खासदारांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

    यावेळी पत्रकारांनी संजय दिना पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडण्यामागील कारण काय आहे? हे विचारले. यावेळी संजय दिना पाटील यांनी नाव न घेता केवळ एका व्यक्तीमुळे आपण पक्ष सोडल्याचं स्पष्ट केलं. संबंधित व्यक्तीबद्दल आपण पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रार केली. पण आपल्या बाजूने निर्णय घेण्यात आला नाही किंवा आपल्या अडचणीवर तोडगा काढण्यात आला नाही, अशी खंत संजय दिना पाटील यांनी व्यक्त केली.

    संजय राऊतांमुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिली?

    यावेळी संजय दिना पाटील यांना खासदार संजय राऊत यांच्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. “मला संजय राऊत यांच्यापासून काहीच प्रोब्लेम नाही. संजय राऊत नेहमी माझ्याबद्दल चांगले बोलले आहेत. त्यांनी मला नेहमी चांगला मान-सन्मान दिला आहे. मलाही त्यांच्याबद्दल खूप मान-सन्मान आहे. मला 2004 मध्ये आमदार बनवण्यासाठी त्यांनी पूर्ण मदत केली. त्यामुळे त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. मला पूर्ण पक्षात कुणाकडूनही अडचण नाही. केवळ एका व्यक्तीचा प्रोब्लेम आहे”, असं संजय दिना पाटील यांनी स्पष्ट केलं.

    “संजय राऊत यांनी मला 2009 मध्ये भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या यांच्या विरोधात खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी खूप मदत केली. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यांना काहीही बोलू द्या. ते मोठे व्यक्ती आहेत. ते काहीही बोलू शकतात. मला त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही. मला ज्यांच्याबद्दल प्रोब्लेम होता त्यांच्याविषयी सांगितलं आहे”, असं संजय दिना यांनी स्पष्ट केलं.

    ‘उद्धव ठाकरेंकडून त्रास नव्हता’

    “मला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर जे नेतेमंडळी आहेत, त्यांच्याबद्दल कोणताही प्रोब्लेम नाही. सगळ्यांनी मला मान-सन्मान दिलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान दिलेला आहे. मी पण तेवढ्याच गोष्टी करतो. कुणी मला एक रुपया करतो तर मी शंभर रुपये करतो. तेवढं केलेलं आहे”, असं संजय दिना म्हणाले.

    Sanjay Dina Patil
    गेल्या रविवारी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली होती

    एका व्यक्तीने त्रास दिल्याचा दावा

    “केवळ एका व्यक्तीने चुकीचं वागलेलं आहे. तोंडावर माझ्याबरोबर गोड बोलायचं आणि माझ्या सर्व लोकांना शिव्या द्यायच्या. आता किती शिव्या सहन करणार? मंचावर बसून शिव्या द्यायला लागले. नेतेमंडळींना सांगून थकलो. सर्व नेतेमंडळींना सांगून टाकलं. पण आता त्यांची काय मजबुरी आहे, ते तुम्ही समजू शकतात. मी एवढा मोठा नेता नाही की, त्यांच्याबद्दल बोलू”, असं संजय दिना म्हणाले.

    पक्षाचे मालक बदलल्याचा संजय दिना यांची टीका

    “काल आपण सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नात बघितलं असेल, पक्षाचे मालक बदली झालेत ना? सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नात येताना बघितलं ना तुम्ही, पक्षाचे मालक कोण आहेत?”, असा सवाल संजय दिना यांनी केला.

    संजय दिना यांना नेमका काय त्रास होता?

    “एक व्यक्ती आम्हा सर्वांना डिस्टर्ब करतोय. आम्ही कुठल्या कार्यक्रमात जाऊ शकत नाहीत. आम्ही खासदार झाल्यावरही निधी वापरु शकत नाहीत. कोण शाखाप्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही. मला कार्यक्रमाला बोलवू शकत नाही. कारण काहीही सांगतात आणि नंतर इकडे येऊन सांगतात की कार्यक्रमाला येत नाही. राजूल ताईला पाठवतात”, असा दावा संजय दिना यांनी केला.

    ‘मुलगी ठाकरे गटात राहिली तरी अडचण नाही’

    “माझ्या घरात सर्वांना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना कोणत्या पक्षात काम करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. माझा पुतण्या भाजपचा कार्यकर्ता आहे. माझी सूनबाई दुसऱ्यांदा भाजपची नगरसेविका आहे. माझ्या मुलीने ठरवलं की ठाकरे गटात राहायचं तर राहूद्या. काही अडचण नाही”, अशी भूमिका संजय दिना पाटील यांनी व्यक्त केली.

    संजय दिना यांची ठाकरेंवर टीका

    “उद्धव ठाकरे आता सर्व खासदारांच्या मतदारसंघात जात आहेत. पण हेच आधी आले असते, येण्याचीदेखील गरज नाही. मला आणि ज्या व्यक्तीकडून त्रास आहे त्याला बोलावलं असतं तर ही वेळच आली नसती ना? मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नसता तर इतरांचाही प्रवेश झाला नसता. मला बोलवून घेतलं असतं, आम्ही जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्या तिकडे येऊन माफी मागा. मी त्यांच्याबरोबर ‘मातोश्री’वर गेलो असतो. विषय संपला असता. पण त्यांना ते करायचंच नाही. त्यांना हवंच नाही. त्यांना ताकदवान लोकं नको. त्यांना गुलाम लोकं पाहिजेत”, अशी टीका संजय दिना पाटील यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा