• Thu. Jun 18th, 2026

    राज्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 17, 2026
    राज्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड – महासंवाद

    मुंबई, दि. १७ : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात जलयुक्त शिवार अभियान २.०, अमृत सरोवर, माजी मालगुजारी तलावांचे बळकटीकरण कार्यक्रम, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

    मंत्रालयात एल निनो च्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा मंत्री संजय राठोड यांनी घेतला. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, सह सचिव पंडित जाधव, उपसचिव मृदुला देशपांडे, अवर सचिव देवेंद्र भामरे, व्यवस्थापकीय संचालक वि. म. देवराज, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील विभागाचे अधीक्षक अभियंता उपस्थित होते. तर सर्व जिल्ह्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

    एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत १५.जून २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते, त्याप्रमाणे सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत. प्रत्येक कामाचे मूल्यमापन करावे. जलयुक्त शिवार अभियान २.० बाहेरील गावांपैकी अतिवृष्टीने क्षतीग्रस्त झालेल्या व पुनर्भरण क्षमता अधिक असलेल्या कामांची दुरुस्ती उपलब्ध शासन निधीतून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री राठोड यांनी दिल्या. मंत्री राठोड म्हणाले की, जिल्हानिहाय जलसाठ्यांमधील गाळ काढणे आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट येत्या पंधरा दिवसांमध्ये पूर्ण करावे; तसेच प्रशासकीय मान्यता दिलेल्या अमृत सरोवरची कामे पूर्ण करावीत.

    नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ४६९ माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. यापैकी ४१२ तलावांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत, उर्वरित कामे पूर्ण करून तसा अहवाल विभागास सादर करावा. तसेच माजी मालगुजारी तलाव मधील अतिक्रमणे काढणे संबंधी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री राठोड यांनी दिल्या.

    ००००

    गजानन पाटील/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed