NMIA International Flights: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा जुलै महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुलं करण्यात आलेल्या या विमानतळावरून लवकरच परदेशभरारी घेणं शक्य होणार आहे.
सर्वप्रथम मालवाहतुकीला सुरुवात
नवी मुंबई विमानतळावर डिसेंबर 2025मध्ये उड्डाणांना सुरूवात झाली. त्यानंतर हळूहळू विमानतळावर 24 तास सेवा सुरू करण्यात आली. आता प्रथम विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीला सुरूवात होणार असून नंतर हळूहळू ठराविक प्रवासी उड्डाणे हाताळली जातील अशी माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे सीईओ बी.व्ही.जे.के. शर्मा यांनी दिली आहे. मुंबईतील ‘बीसीबीए लॉजिस्टिक कॉन्क्लेव्ह’च्या वेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. हळूहळू मालवाहुतीच्या ऑपरेशन्समध्ये वाढ करण्याचं विमानतळाचं उद्दिष्ट आहे.
Navi Mumbai Metro: नवी मुंबईत मेट्रोचं ‘मेगा नेटवर्क’! दोन नव्या मार्गिकांमुळे प्रवास सुखद होणार; कल्याणपर्यंत पोहोचणं शक्य
15 जुलै 2026पासून विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या उड्डाणांना सुरूवात होणार आहे. साप्ताहिक 18 विमान उड्डाणांचं त्यांचं लक्ष्य आहे. तसचं, प्रवासी उड्डाणांसाठी हालचालीही सुरू आहेत. त्यामुळे 15 जुलैपर्यंत प्रवाशांसाठीही उड्डाणांना सुरूवात होण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो या दोन विमान कंपन्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानतळावर सेवा देतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे पश्चिम भारतात हवाई वाहतुकीचे हे एक महत्त्वाचं ठिकाण बनणार आहे.
5 जुलैपर्यंत अधिसूचना जारी करणार
या विस्तारासाठी अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे. सीमाशुल्क अधिकारी याची पाहणी करत आहेत. ‘सेंट्रल बोर्ड ऑफ इंडिरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स’ने (CBICS) मंगळवारीच विमानतळाची पाहणी केली. आंतराराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या अधिसूचना देण्यात आल्या आहेत. शेवटची पाहणी काल सुरू होती. त्यानंतर चाचणी फेऱ्या सुरू होतील. 5 जुलैपर्यंत सीमाशुल्क अधिकारी ट्रेड नोटीस जारी करतील.
नवी मुंबई विमानतळावर वाहतूक सुरू झाल्यापासून मुंबई विमानतळासाठी हा एक महत्त्वाचा पर्याय बनला आहे. दररोज 150 उड्डाणं हाताळली जात असून 20,000 प्रवासी प्रवास करतात. येत्या काही महिन्यांत जसजसा सेवांचा विस्तार होतो तसं प्रवाशांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. वर्षाअखेरीस विमानतळावर दररोज 50,000 प्रवासी हाताळण्याचं उद्दिष्ट आहे. तसेच, हवाई वाहतुकीची संख्या 380वर पोहोचण्याची शक्यता आहे.
Pune-Shirdi Railway: पुण्याहून शिर्डीला जाणं सोपं होणार! पहिल्यांदाच सुरू होणार थेट रेल्वेसेवा; ‘इंटरसिटी’प्रमाणे ट्रेन
दुसऱ्या टर्मिनलचा विस्तार
याशिवाय नवी मुंबई विमानतळावर दुसऱ्या टर्मिनलचा विस्तारसुद्धा होणार असल्याची माहिती शर्मांनी यावेळी दिली. यापूर्वी तयार केलेल्या योजनेत 3 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेलं टर्मिनल उभारण्यात येणार होतं. आता आणखी मोठ्या टर्मिनलचा विचार सुरू असून पुन्हा आराखडा तयार केला जात आहे. 5 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेलं टर्मिनल डिझाइन करण्यात येत आहे. येत्या काही वर्षांमध्ये विमानतळाला मेट्रो लाइन 8, हाय स्पीड रेल्वे आणि रस्ते-उड्डाणपुलांमुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
