• Tue. Jun 16th, 2026

    हाळगाव येथील शासकीय कृषी महाविद्यालयास पाणी पुरवठ्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 16, 2026
    हाळगाव येथील शासकीय कृषी महाविद्यालयास पाणी पुरवठ्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. १६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी देण्याचा २६.९१ कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

    विधान भवन, मुंबई येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांविषयक बैठक झाली. बैठकीस कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी सचिव परिमल सिंह यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते; तर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, हाळगाव येथील कृषी महाविद्यालयापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मांगी मध्यम प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपसा जलसिंचन योजना राबविण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने कार्य परिषदेची मान्यता देऊन तो शासनास तातडीने सादर करावा. त्याच बरोबर महाविद्यालयातील विश्रामगृहाचे नूतनीकरण, अंतर्गत रस्त्यांची उभारणी, खेळाचे मैदान, गोदाम तसेच इतर पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन विविध विभागांमध्ये समन्वय साधावा.

    बैठकीत महाविद्यालय परिसरात विविध शेड्स, पाइपलाइन व कुंपण उभारणीसह पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. महाविद्यालय सुरू होऊन आठ वर्षे उलटूनही भूसंपादन प्रक्रिया व अन्य काही कामे अपूर्ण असल्याबद्दल प्रा. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठीकृषी, सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि जलसंपदा विभागांनी परस्पर समन्वय राखून त्यांची जबाबदारी चोख पार पाडावी, असेही ते म्हणाले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाविद्यालयाशी संबंधित सर्व प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावेत. हे प्रस्ताव प्राप्त होताच शासनस्तरावरून त्यांना बिनाविलंब मान्यता देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

    ०००००

    एकनाथ पोवार/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed