• Wed. Jun 17th, 2026

    पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 15, 2026
    पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सुखकर करण्यासाठी विविध शासकीय योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा,  सहायक आुयक्त संतोष चिकणे यांच्यासह ज्येठ नागरीक संघटनेचे पदाधिकारी आणि  विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे, त्यांना आरोग्य विषयक सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी.   जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध असून त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

    बैठकीत पालकमंत्री श्री. राणे यांनी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आणि अनुभवसंपन्न घटक असल्याचे सांगत त्यांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने कार्य करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा, निवृत्तीवेतन योजना, कायदेशीर संरक्षण तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनांशी समन्वय वाढवून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

    बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सादर केली. तसेच समिती सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी विविध सूचना आणि प्रस्ताव मांडले. या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. राणे यांनी स्पष्ट केले.

    **

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed