Tadoba Andhari Tiger Reserve: ताडोब्यात वाघांसोबतच बिबट, अस्वल, सांबर, हरण, विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी आढळतात. ही विविधता पर्यटनाला बळ देणारी ठरली आहे.
जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या, घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या व्याघ्रप्रकल्पात येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. विदर्भात यंदा उन्हाळा तापदायक असला तरी पर्यटकांच्या संख्येवर कुठलाही परिणाम झालेला नाही. मागील तीन महिन्यांच्या कालावधीत कोअर क्षेत्रात ३७ हजार २१२ व बफर क्षेत्रात ८४ हजार १०५ पर्यटकांनी हजेरी लावली आहे. त्यातून १५ कोटी ६२ लाख ८५ हजार ७९० महसूल मिळाला आहे. त्यात कोअर झोनमधील ४ कोटी ५६ लाख २९ हजार ७९०, तर बफर झोनमधील ११ कोटी ६ लाख ५६ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
पळून जाऊ असा दम देणाऱ्या नवरीला दामिनी पथक येताच कापरं भरलं, हायव्होल्टेज ड्राम्यानंतर बालविवाह रोखला
व्याघ्रसमृद्धी अनुभवण्यासाठी दरवर्षी जगभरातून पर्यटक ताडोब्याला भेट देतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रविना टंडन यांच्यासह अनेक दिग्गज ताडोब्याला दरवर्षी भेट देतात. विदर्भाच्या भूमीत येणाऱ्यांची पाऊले आपसूकच ताडोब्याकडे वळत असतात. दिवाळीच्या सुट्ट्यांसह उन्हाळ्यातील ९० टक्के बुकिंग आधीच फुल्ल झालेले असते.
दरम्यान, विदर्भाबाहेरील पर्यटकांनी ताडोब्यासह पेंच, नवेगाव-नागझिरा, मेळघाट व बोरकडेही आपला मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळविला आहे. यातून ताडोब्याला नवे पर्याय उपलब्ध झाल्याचे दिसून आले आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पातही पर्यटकांनी मोठी उपस्थिती लावल्याचे अलीकडेच समोर आले. एवढेच नव्हे तर उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यालादेखील पर्यटकांनी पसंती दिली आहे. परिणामी व्याघ्रपर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत.
Supriya Sule On Nana Patole | नाना पटोलेंचा दावा खरा? सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
१९ हजारांवर परदेशींची नोंद
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील वर्षभरात ३ लाख ८१ हजार पर्यटकांनी हजेरी लावली आहे. यातून सुमारे ३५ कोटींचा महसूल मिळाला आहे. दरवर्षी साधारणत: चार ते आठ हजारांपर्यंत पर्यटकांची नोंद ताडोब्यात होते. यंदा प्रथमच परदेशी पर्यटकांची संख्या वाढल्याचेही दिसून आले आहे. २०२५-२६मध्ये सुमारे १९ हजार परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
३० जूनलाच पावसाळी सुट्टी
जैवविविधतेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते. हीच बाब लक्षात घेऊन १ जुलैपासून व्याघ्रप्रकल्पांना पावसाळी सुट्टी जाहीर केली जाते. ताडोब्यातील कोअर क्षेत्रात दर मंगळवारी आठवडी सुट्टी असते. या महिन्यात ३० जूनला मंगळवार येत असल्याने पावसाळी सुट्टी याच दिवसापासून लागू होणार आहे. एक दिवसापूर्वीच ताडोब्यातील कोअर झोनमधील दरवाजे पर्यटकांसाठी बंद होणार आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत कोअर झोनमधील सहाही दरवाजे पर्यटनासाठी बंद राहणार आहेत. १ ऑक्टोबरपासून हे गेट पूर्ववर उघडले जाणार आहेत. पावसाळी सुट्टीच्या कालावधीत बफर झोनमधील पर्यटन सुरू राहणार आहे. बफर क्षेत्रात १६ गेट असून पावसामुळे रस्त्यांची स्थिती बघून सफारीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
