महापौर मंजूषा नागपुरे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला. या वेळी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर; तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांच्या उपस्थितीत ही माहिती दिली. खडकवासला धरणसाखळीतील झपाट्याने घटणारा जलसाठा आणि पुढील तीन महिन्यांचे नियोजन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्पष्टीकरण द्यावे
मुळशी धरणातून पुणे शहरासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव पूर्वीच मान्य झाला आहे. त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. या प्रस्तावासंदर्भात महापालिका प्रशासनाने आतापर्यंत काय कार्यवाही केली याचे स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पाणीपुरवठा गुरुवारी विभागाला दिले आहेत. आज (शुक्रवारी) होणाऱ्या स्थायीच्या बैठकीत पाणीपुरवठा विभाग याबाबत माहिती देणार आहे, असे भिमाले म्हणाले.
‘सम’ तारखांना या भागांना पुरवठा
डेक्कन, प्रभात रस्ता, एरंडवणा, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, जनता वसाहत, गोखलेनगर, औंध, खडकी, बोपोडी, बालेवाडी, भोसलेनगर, सुतारवाडी, पाषाण, म्हाळुंगे, बाणेर, वारजे, कर्वेनगरचा काही भाग, तळजाई, कोंढवा बुद्रुकचा मोठा भाग, बालाजीनगर, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, हिंगणे, नांदेड, नवी पेठ, पर्वती, येरवडा, चंदननगर, पठारे वस्ती, बायपास खराडी, कळस, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, घोरपडी, केशवनगर; तसेच मध्य आणि पूर्व पुण्यातील पेठा परिसरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
‘विषम’ तारखांना या भागांना पाणी
पश्चिम, दक्षिण आणि पूर्व भागातील अनेक परिसरांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोथरूड (लक्ष्मीनगर वगळून), बावधन खुर्द व बुद्रुक, सुस रस्ता, पंचवटी, आंबेगाव खुर्द, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज गावठाण, सुखसागरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, धायरीचा मोठा भाग, वडगाव गावठाण, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, गंगाधाम, पद्मावती, चिंतामणीनगर, सहकारनगरचा काही भाग, पर्वती गावठाण परिसर, खराडीतील काही भाग, कल्याणीनगर, चंदननगर, वडगाव शेरीचा काही भाग, संगमवाडी, मुंढवा, मगरपट्टा, हडपसरचा काही भाग, मुंढवा, वानवडी गावठाण, पुणे कँटोन्मेंट, विमाननगर आणि विश्रांतवाडीतील काही भागांचा समावेश आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणीगळती, अपव्यय आणि अनावश्यक वापर टाळावा; तसेच पाण्याचा विनाकारण साठा करू नये. धरणांमध्ये समाधानकारक आवक सुरू झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
– मंजूषा नागपुरे, महापौर
‘भामा आसखेड ‘ला पाणीकपात नाही
भामा आसखेड प्रकल्पातून सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत या प्रकल्पातून ज्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो, तो भाग दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या नियोजनातून वगळण्यात आला आहे. या परिसरातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर या ठिकाणचे पाणीकपातीचे नियोजन जाहीर करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
वाघोली-मांजरी आणि फुरसुंगी, उरुळी देवाची
मांजरीला सध्या दिवसाआड, तर फुरसुंगी, उरुळी देवाची यांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने या ठिकाणी कोणतेही स्वतंत्र नियोजन करण्यात आलेले नाही. सध्या सुरू असलेल्या नियोजनाप्रमाणेच या ठिकाणचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. वाघोली जलकेंद्रातून तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने येथील परिस्थितीही तशीच राहणार आहे.