बीड, दि. ३१: बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी, जिजाऊ माँ साहेब को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मातोश्री को. ऑपरेटीव्ह यासारख्या इतरही वित्तीय संस्थांनी जनतेची व ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकारची फसवणूक रोखण्यासाठी आणि ठेवीदारांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी, ठेवीदारांना न्याय देण्यासाठी संबंधित आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाईला संबंधित यंत्रणांनी गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आज येथे दिले.
आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात एमपीआयडी कायदा (MPID Act) म्हणजेच ‘महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 ची अंमलबजावणी करण्यासंदर्भात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, आमदार नमिता मुंदडा, पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, आमदार सुरेश धस, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण फसव्या वित्तीय संस्थांवर जिल्हाधिकारी कार्यालय, बीड आणि विशेष न्यायालयामार्फत जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे वसूल करण्याची कायदेशीर प्रक्रिया याबाबत करण्यात येत असलेल्या कारवाईचे सादरीकरण केले. यावेळी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परिसर विकास आराखद्याची अंमलबजावणी आणि आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचाही सविस्तर आढावा घेतला. या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विकासाचा मास्टर प्लॅन ( बृहद आराखडा ) दिवंगत अजित दादांनी बनविला होता, त्यानुसार विकास साध्य होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
०००
