दोन दिवस उष्ण वातावरण
सन २०२३ ला जून महिन्यात ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. यासोबतच जूनमधील किमान तापमानानेही यंदा विक्रम केला असून सातत्याने पाच दिवस कुलाबा येथे ३० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले जात आहे. गुरुवारी कुलाबा येथे सरासरीपेक्षा ३.५ अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. सांताक्रूझ येथे कुलाब्यापेक्षा कमी कमाल तापमान होते. सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.३ अंशांनी अधिक होते. वायव्येकडून येणारे वारे, आकाशात पावसाळी ढग नसणे यामुळे कोकण विभागात चढे तापमान होते. गुरुवारी अलिबाग येथे ३६.६ तर हर्णे येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या केंद्रांवरील तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी अधिक होते. कमाल तापमानासोबत किमान तापमानाचाही पारा चढा आहे. मुंबईत कुलाबा येथे गेल्या पाच दिवसांपासून ३० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होत आहे. सातत्याने पाच दिवस किमान तापमानाचा पाराही चढा असल्याने मुंबईकरांची रात्रीची झोपही हरवली आहे. २४ तासांमध्ये तापमानाचा पारा ३० अंशाखाली जात नसल्याने वातावरणात उष्णता साचून राहिल्याची सातत्याने जाणीव होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवार १२ आणि शनिवार १३ जूनसाठी उष्ण आणि दमट वातावरणाचा महामुंबईला इशारा दिला आहे.
पुण्यात पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. पोषक वातावरणामुळे मान्सून प्रवास मंदावला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती ‘आयएमडी’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
पुण्यात आगमन लांबले
पुण्यामध्ये सर्वसाधारणपणे दर वर्षी १० जूनच्या सुमारास दाखल होणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन यंदा रखडले आहे. प्रतिकूल घडामोडींमुळे महाराष्ट्रात मान्सूनची पुढील वाटचाल थंडावली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे.
मान्सूनने सहा जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र, त्याची प्रगती थांबली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, नैर्ऋत्य मोसमी वारे कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहारच्या काही भागापर्यंत; तसेच उत्तर सीमेला हर्णै, सोलापूर, हैदराबादमध्ये सरकला. विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत झालेला पाऊस पूर्वमोसमी आहे.
पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख १० जून आहे. एक किंवा दोन दिवस मागे-पुढे होणे सामान्य मानले जाते. मात्र, पुढील दोन दिवस मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण नसल्याने पुण्यात मान्सूनचे आगमन लांबले असल्याचे म्हणता येईल. सुरुवातीच्या टप्प्यात काही काळ प्रवास थांबणे सामान्य असून, याचा अर्थ संपूर्ण हंगाम लांबणार असा नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भात पूर्वमान्सूनचा धुमाकूळ
भारतीय हवामान विभागाने विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. सध्या विदर्भात वादळी वाऱ्यांसह पूर्वमान्सूनच्या जोरदार सरी बरसत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत ढगाळ वातावरण कायम राहून उष्मा वाढण्याची शक्यता आहे.
खानदेशमध्ये मान्सून लांबणीवर
दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. उन्हाच्या झळा कायम राहणार असून मान्सूनसाठी 15 जूनची प्रतीक्षा कायम राहणार आहे.
Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती सुरू, पण मुंबई-पुण्यात आणखी काही दिवस प्रतीक्षा; कोण-कोणत्या भागांत पावसाचा अंदाज?
कोकणातून मान्सून मंदावला
कोकणात काही दिवसांपूर्वीच मान्सून धडकला असला तरी पुढील वाटचाल मंदावली आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात मुसळधार पाऊस बरसतो पण यंदा कोकणात हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळतो आहे.
